Maharashtra Assembly Monsoon Session Highlights: राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ५ जुलै रोजी विजय मेळावा साजरा केला जाणार आहे. तर राज्यातील हजारो वारकरी पंढरपूरकडे निघाले आहेत, यादरम्यान शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी वारीत अर्बन नक्षल घुसल्याचा दावा केला आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून विरोधकांकडून शेतकऱ्यांचा मुद्दा लावून धरला जात आहे. विधिमंडळ अधिवेशनचा आज चौथा दिवस असून विधिमंडळात घडणार्‍या प्रत्येक घडामोडींचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवरही आपलं लक्ष असेल.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

18:04 (IST) 3 Jul 2025

शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना खोलीत डांबण्याचे सत्र, धुळ्यातील इंग्रजी माध्यम शाळेतील प्रकार

धुळे शहरातील चावरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण शुल्क न भरल्याने ३५ ते ४० विद्यार्थ्यांना वाचनालयाच्या खोलीत दररोज काही तास डांबून ठेवले जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. ...सविस्तर वाचा
17:54 (IST) 3 Jul 2025

मानखुर्दहून वाशीकडे जाणाऱ्या लोकलमधून प्रवासी पडला

मुंबईतल्या हार्बर मार्गावरील मानखुर्दवरून वाशीला जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून एक प्रवासी खाली पडला आहे. त्यामुळे काही वेळ लोकल सेवा ठप्प झाली होती. तर त्याच वेळेत मागून पनवेलकडे जाणारी जनरल लोकल देखील प्लॅटफॉर्मवर आली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण मागून येणारी लोकल सुरक्षित अंतरावर थांबली. जखमी प्रवाशाला आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

16:55 (IST) 3 Jul 2025

मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यावसायिकांचा संप

मीरा-भाईंदरमध्ये दोन दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी रेस्टॉरंट मालकाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मीरा भाईंदरमधील दुकाने बंद ठेवत संप पाळला आहे.

16:46 (IST) 3 Jul 2025

राणेनगर बोगदा कामामुळे समस्यांमध्ये भर, पूर्वसूचनेअभावी रहिवाशांचे हाल

नाशिकमधील राणे नगर बोगदा रस्ता रुंदीकरणासाठी बंद करण्यात आला असून कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने नागरिकांत नाराजी आहे. ...सविस्तर बातमी
16:11 (IST) 3 Jul 2025

रायगड जिल्ह्यात एका दिवसात ६ बलात्कार; वडेट्टीवारांची राज्यात शक्ती कायदा लागू करण्याची मागणी

"एका दिवशी रायगड जिल्ह्यात सहा बलात्कार झाले, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची काय अवस्था असेल हे सांगण्याची गरज नाही. कळत नाही महिलांवरील अत्याचार वाढत असताना तुम्ही शक्ती कायदा का लागू करत नाही. शक्ती कायदा लागू करा आणि या अधिवेशनात लागू करा अशी मागणी मी करणार आहे. महिला या राज्यात सुरक्षित आहेत का हा प्रश्न आम्ही सरकारला विचारू," असेही वडेट्टीवार म्हणाले.

14:47 (IST) 3 Jul 2025

विद्यार्थ्यांच्या मदतीला बुक क्लब उपक्रम - श्रमजीवी महिला संस्थेचा पुढाकार

संस्थेने मदतीचा हात दिल्याने पैशांअभावी महाविद्यालयीन शिक्षणाचा मार्ग अडलेल्या आठ मुली यंदा अकरावीत प्रवेश घेत आहेत. ...अधिक वाचा
14:34 (IST) 3 Jul 2025

गुन्ह्यांमुळे सुनील बागूल, मामा राजवाडे यांचा भाजप प्रवेश ऐनवेळी रद्द

फरार संशयित भाजपमध्ये प्रवेश घेत असल्याने खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडल्यानंतर तूर्तास उभयंतांचे प्रवेश पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जाते. ...अधिक वाचा
14:33 (IST) 3 Jul 2025

धुळ्यात केशर आंबा, रामफळनंतर हेक्टरी ७५ क्विंटल मका उत्पादनाचा विक्रम

जिल्ह्यातील लोणखेडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष रमेश पाटील यांनी येथील हेक्टरी ७५ क्विंटल मक्याचे पिक घेवून एका शेतकऱ्याने विशेष प्रयोगाची खात्री दिली आहे. ...सविस्तर वाचा
13:49 (IST) 3 Jul 2025

नवी मुंबईत इमारतीची संरक्षक भिंत कोसळली; घटना CCTVमध्ये कैद

नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर २० मधील एका निवासी सोसायटीमध्ये गुरुवारी पहाटे एक मोठा अपघात घडला. सोसायटीची सुरक्षा भिंत अचानक कोसळली, ज्यामुळे जवळच उभ्या असलेल्या चार दुचाकी (बाईक आणि स्कूटर) थेट खड्ड्यात पडल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सोसायटीच्या शेजारी बांधकाम सुरू होते. या बांधकामामुळे जमीन कमकुवत झाली आणि सुरक्षा भिंत कोसळली. घटनेच्या वेळी जवळपास कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

13:16 (IST) 3 Jul 2025

मुंबई-गोवा महामार्गावर बांदा येथे कार पुलावरून कोसळली; चार युवक थोडक्यात बचावले

या अपघातात सावंतवाडी येथील चार युवक थोडक्यात बचावले असून, बांदा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांची सुटका केली. ...सविस्तर बातमी
12:59 (IST) 3 Jul 2025
'नारायण राणेंच्या मुलाने नाक घासून माफी मागायला पाहिजे'; दिशा सालियन प्रकरणातील आरोपांवर संजय राऊतांची मागणी

दिशा सालियन हिची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही, असा दावा मुंबई पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून केला आहे, यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "पोलीस तर आमचे नाहीत, एसआयटी आमची नाही. आपणच ती स्थापन केली होती. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे युवा नेते आहेत. त्यांचं नेतृत्व खच्ची करण्यासाठी षडयंत्र रचण्यात आलं, त्यांना बदनाम करण्यात आलं. शेवटी सत्य समोर येत आहे. सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला हवी. त्यानंतर नारायण राणे यांचा मंत्री असलेल्या मुलाने नाक घासून माफी मागायला पाहिजे. ज्यांनी बदनामी केली त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागणं गरजेचं आहे," असे राऊत म्हणाले आहेत.

12:37 (IST) 3 Jul 2025

Video : नंदुरबार जिल्ह्यात अंत्यविधीसाठी मृतदेह नदीतून नेण्याची कसरत…मृत्युनंतरही मरणयातना कायम

नंदुरबार तालुक्यातील शेगवे गावात पूल नसल्याने नदीतील पाण्यातून स्मशानभूमीपर्यंत मृतदेह घेऊन जाण्याची कसरत नातेवाईकांना करावी लागली. ...वाचा सविस्तर
12:00 (IST) 3 Jul 2025

नरेंद्र, देवेंद्र, रवींद्र" बॅनर चर्चेत; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना हटके शुभेच्छा

मुंबईत भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन करणारा एक हटके बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. "नरेंद्र, देवेंद्र आणि रवींद्र" अशी नावांची मांडणी करत अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेने हा अभिनंदनाचा बॅनर लावला आहे. मुंबईच्या जेजे ब्रिज परिसरात ही बॅनरबाजी करण्यात आली असून, या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नव्याने प्रदेशाध्यक्ष पदावर विराजमान झालेले रवींद्र चव्हाण या तिघांचे फोटो झळकत आहेत.

11:22 (IST) 3 Jul 2025

"शेतकरी उपाशी, मंत्री तुपाशी";विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

विधिमंडळ अधिवेशनचा आज चौथा दिवस असून आजही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी "शेतकरी उपाशी, मंत्री तुपाशी", "जादूटोणा करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो" अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. यावेळी विरोधी आमदारांच्या हातात संविधान देखील पाहायला मिळाले.

11:08 (IST) 3 Jul 2025

"भाजपात गेलेला प्रत्येक मराठी माणूस हा महाराष्ट्राचा शत्रू", संजय राऊतांची नारायण राणेंवर टीका

भाजपा नेते नारायण राणे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने फार फरक पडणार नाही असे विधान केले होते. नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला आता शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, "नारायण राणे यांनी काय बोलावं आणि काय बोलू नये हे त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यांच्या बोलण्याकडे महाराष्ट्र फार गांभिर्याने पाहत नाही. ज्या व्यक्तीने दोन-तीन वेळा पक्ष बललला आहे, जी व्यक्ती स्वतःचा पक्ष चालवू शकली नाही... जी व्यक्ती काँग्रेसमध्ये गेली, त्या काँग्रेस पक्षाला शिव्या घातल्या. भाजपात गेले, तिथेही त्यांचं सुरुवातीपासून नीट जमत नाहीये... शिवसेनेतही त्यांनी शेवटी गोंधळ घातला... भाजपात गेलेला प्रत्येक मराठी माणूस हा महाराष्ट्राचा शत्रू आहे. त्यांना मराठी माणूस, महाराष्ट्र यावर प्रवचनं झोडण्याचा अधिकार नाही. नारायण राणे यांनी सुद्धा कोकणात जाऊन मराठी माणसाचं नुकसान केलं आहे. नारायण राणे सगळे तुमच्यासारखे गुलाम नसतात... सगळे आपली चामडी वाचवायला पक्ष बदलत नाहीत... काही स्वाभीमानी लोक आजही आहेत..."