मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात राज्यात सर्वदूर चांगली पर्जन्यवृष्टी झाली आहे. परिणामी राज्यभरातील धरणे तुडूंब भरली आहेत. लहान, मध्यम आणि मोठ्या धरण प्रकल्पांमध्ये सरासरी ७२.३८ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. कोकण विभाग आघाडीवर असून पाणीसाठा तब्बल ८४.८३ टक्क्यांवर गेला आहे.

जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात लहान, मध्यम व मोठे, अशी एकूण २९९७ धरणे आहेत. सोमवारअखेर या सर्व धरणांमध्ये सुमारे ७२.३८ टक्के म्हणजे १०३६.१५१ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे. कोकण विभागात एकूण १७३ धरणे असून, त्यांमध्ये सुमारे ११२.४०३ टीएमसी, ८४.८३ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. नाशिक विभागात ५३७ इतकी धरणे असून, त्यामध्ये १४१.६७१ टीएमसी, ६७.५८ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा आहे.

पुणे विभागात एकूण ७२० धरणे असून, ४४३.७५२ टीएमसी, ८२.६२ टक्के पाणीसाठा आहे. मराठवाडा विभागामध्ये ९२० धरणे असून, त्यामध्ये १५१.२०९ टीएमसी, ५८.९७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. अमरावती विभागामध्ये २६४ धरणे असून, त्यामध्ये ८३.३६४ टीएमसी, ६२.४२ टक्के पाणीसाठा आहे. नागपूर विभागात ३८३ धरणे असून, या धरणांमध्ये १०५.१६४ टीएमसी, ६४.१३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

मोठी धरणेही तुडूंब

राज्यातील प्रमुख मोठी तीन धरणेही तुडूंब भरली आहेत. उजनी धरण ९८.८८ टक्के भरले असून, ११५.९३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण ८३ टक्के भरले असून, ८७.३८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जायकवाडी धरण ९३.६४ टक्के भरले असून, ९६.२० टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

मुंबई, नवी मुंबईची पाणी चिंता मिटली

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे असलेल्या पाच धरणांमध्ये सुमारे ९६.२४ टक्के पाणीसाठा झाला असून, १७.१० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. ठाणे महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या बारावी धरणात सुमारे ११.२५ टीएमसी पाणीसाठा आहे. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोराबे आणि हेटवणे धरणात ९.९१८ टीएमसी पाणीसाठा आहे.

मुळशीत आजवरचा सर्वाधिक पाऊस

यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत सर्वात जास्त पाऊस मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाला असून, मुळशीत ४९१४ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. घाटघर धरणाच्या पाणलोटात ३५६९ मिमी, महाबळेश्वरमध्ये ३५६२ मिमी आणि लोणावळा येथे ३१९० मिमी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी दिली आहे.