scorecardresearch

Maharashtra News : दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट

Maharashtra Breaking News : राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तसंच इतर क्षेत्रातील सर्व घडामोडी जाणून घ्या

Maharashtra News : दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज अपडेट

Maharashtra Political Crisis News in Marathi, 25 August 2022: शिवसेनेतील फूट आणि सत्तासंघर्षांचे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठापुढे सोपविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी घेतला. घटनापीठाची स्थापना तातडीने करण्यात येणार असून, या याचिकांवर गुरुवारी (२५ ऑगस्ट) सुनावणी होईल, असे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यसूचीत आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण लिस्ट नाही. त्यामुळे आज यावर सुनावणी होणार की नाही? याबाबत अनिश्चितता आहे.

त्याचबरोबर, गेल्या काही दिवसांपासून विधानसभेत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. बुधवारी विधानसभेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजीवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज विधीमंडळात याचे पडसाद उमठण्याची शक्यता आहे.

तसेच जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा जवानांनी उधळून लावला आहे. भूसुरुंग स्फोटामध्ये दोन दहशतवादी ठार झाले असून एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्याला याआधीही नियंत्रण रेषा पार केल्यामुळे अटक करण्यात आली होती. भारतीय चौकीवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराच्या कर्नलने त्याला ३० हजार रुपये (पाकिस्तानी चलन) दिले होते, अशीही माहिती मिळाली आहे.

Live Updates

Maharashtra Political Crisis Live Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!

19:01 (IST) 25 Aug 2022
पुणे : महाविकास आघाडीमुळे पुणेकरांवर कराचे ओझे : जगदीश मुळीक यांची टीका

राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमुळे पुणेकरांवर कराचे ओझे लादले गेले असून, या संदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुणेकरांना दिलासा देऊ अशी ग्वाही भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. बातमी वाचा सविस्तर…

18:40 (IST) 25 Aug 2022
ससून रूग्णालयात रूग्णांसह कर्मचाऱ्यांची फसवणूक 

मुख्यमंत्री कार्यालयातून डॉक्टर बोलत असल्याची बतावणी करून एकाने ससून रूग्णालयातील रूग्णांसह कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार २२ ऑगस्ट रोजी घडला आहे. बातमी वाचा सविस्तर…

18:38 (IST) 25 Aug 2022
पुण्यात घरफोड्यांचे सत्र कायम; बाणेरमधील बंद सदनिका फोडून १८ लाखांचा ऐवज चोरीस

पुणे शहरातील घरफोड्यांचे सत्र कायम असून, चोरट्यांनी बाणेर रस्त्यावरील बहुमजली इमारतीमधील बंद सदनिका फोडून तब्बल १८ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी…

18:23 (IST) 25 Aug 2022
पिंपरी: निगडीतील रहिवाशांचे महावितरण कार्यालयात आंदोलन

निगडी पेठ क्रमांक २२ येथे गेल्या पाच महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वारंवार सांगूनही महावितरण अधिकारी दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करत या भागातील रहिवाशांनी निगडी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. बातमी वाचा सविस्तर…

17:08 (IST) 25 Aug 2022
मुंबई : म्हाडा प्रतीक्षानगरमध्ये ५२८ घरे बांधणार

म्हाडाच्या मुंबई मंडळाने शीव, प्रतीक्षानगर परिसरात नवीन ५२८ घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे. मध्यम गटासाठी ही घरे असून चारपैकी एका इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. या घरांचे बांधकाम तीन वर्षांत पूर्ण करून सोडतीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. बातमी वाचा सविस्तर…

17:04 (IST) 25 Aug 2022
मुंबई : खड्डेमय रस्त्यांमुळे अंतराळवीरांसारखा पोशाख परिधान करत, मनसेचे महानगरपालिकेच्या निषेधार्थ आंदोलन

खड्डेमय रस्त्यांमुळे मुंबईकर त्रस्त असून ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. खड्डे बुजविण्यात अपयशी ठरलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज (गुरुवार) घाटकोपर येथे अंतराळवीरांसारखा पोशाख परिधान करून आंदोलन केले. वाचा सविस्तर बातमी…

16:35 (IST) 25 Aug 2022
मुंबई : स्वस्त गाड्या, भंगाराच्या कंत्राटाचे आमिष दाखवून पोलीस शिपायाची फसवणूक

स्वस्तात मोटरगाडी आणि सीमाशुल्क विभागाच्या भंगाराच्या कंत्राटातून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका पोलीस शिपायासह त्याचे नातेवाईक-मित्रांना सुमारे ४८ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बातमी वाचा सविस्तर…

16:09 (IST) 25 Aug 2022
बुलढाणा : विवाहितेचा छळ प्रकरणी शिक्षक पतीसह चौघांवर गुन्हे

विवाहितेच्या छळप्रकरणी लोणार पोलिसांनी शिक्षक असलेल्या पतीसह चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. पतीचे अनैतिक संबंध असल्याचे विवाहित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. वाचा सविस्तर बातमी…

16:02 (IST) 25 Aug 2022
पुणे : गुंडांकडून पाच पिस्तुले, ११ काडतुसे जप्त

बेकायदा पिस्तुल बाळगणाऱ्या सराईतांना गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्याकडून पाच पिस्तुले आणि ११ काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. बातमी वाचा सविस्तर…

15:39 (IST) 25 Aug 2022
नागपूर : बेवारस मूकबधिर मुलगा सहा वर्षानंतर आईकडे परत ; आधार कार्डमुळे सापडला पत्ता

सहा वर्षांपूर्वी नागपूर रेल्वेस्थानकावर बेवारस आढळलेल्या मूकबधिर मुलाचा त्याचे आधार कार्ड तयार करताना मूळ गाव व पालकांचा शोध लागल्याने सहा वर्षानंतर त्याच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले. सोचनकुमार बलम यादव असे या मूकबधिर मुलाचे नाव आहे. बातमी वाचा सविस्तर…

14:59 (IST) 25 Aug 2022
पुणे : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी ३.६७ कोटींची मागणी ; जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्य शासनाला अहवाल

चालू वर्षी जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीपोटी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तीन कोटी ६७ लाख ९० हजार रुपयांच्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. बातमी वाचा सविस्तर…

14:42 (IST) 25 Aug 2022
पुणे : जिल्ह्यातील विशेष शाळांची वर्षातून तीन वेळा तपासणी

जिल्ह्यातील शारीरिक विकलांग विद्यार्थ्यांच्या विशेष शाळांची शिक्षण विभागाकडून तपासणी होणार आहे. गुणवत्तेसोबतच शाळांमध्ये चांगल्या भौतिक सुविधा पुरवल्या जात आहेत किंवा कसे, याची वर्षातून तीन वेळा तपासणी करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकऱ्यांनी दिले आहेत. बातमी वाचा सविस्तर…

14:19 (IST) 25 Aug 2022
पुणे : मिळकत कराच्या फरकाची रक्कम भरण्याला तूर्त स्थगिती

मिळकत कराच्या फरकाची रक्कम भरण्याच्या निर्णयाला महापालिका प्रशासनाने तूर्त स्थगिती दिल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी बुधवारी स्पष्ट केले. नियमित देयकांव्यतिरिक्त फरकाच्या वाढीव देयकांबाबत पुढील निर्णय होईपर्यंत नागरिकांनी रक्कम भरू नये, असा निर्णय महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्या मान्यतेने घेण्यात आला. बातमी वाचा सविस्तर…

14:03 (IST) 25 Aug 2022
पुणे : जिल्ह्यातील १९४ अपूर्ण कामांसाठी नियोजन समितीकडून १२.६८ कोटी

जिल्ह्यातील सन २०२१-२२ या वर्षातील १९४ अपूर्ण कामांसाठी १२ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून (डीपीडीसी) जिल्हा परिषदेला देण्यात येणार आहे. या १९४ अपूर्ण कामांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, आयुर्वेदिक दवाखान्यांची देखभाल दुरुस्ती, बांधकाम, विस्तारीकरण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. बातमी वाचा सविस्तर…

14:02 (IST) 25 Aug 2022
नागपूर : कर्करोगग्रस्तांचा वाली कोण?, औषधांसाठी रुग्ण व नातेवाईक अधिष्ठाता कार्यालयात

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) कर्करोग विभागात महिनाभरापासून किमोथेरपीपूर्वी दिले जाणारे औषध नाही, इंजेक्शन व साध्या औषध मिळत नाही. ते बाहेरून घेण्यासाठी नातेवाईकांकडे पैसे नाहीत. त्यामुळे या रुग्णांचा वाली कोण? असा प्रश्न करत रुग्णांनी मरायचे काय? हा प्रश्न घेऊन संतप्त रुग्ण व त्यांचे नातेवाईक काल (बुधवार) थेट अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्या कार्यालयात धडकले. वाचा सविस्तर बातमी…

13:50 (IST) 25 Aug 2022
Maharashtra Assembly Session: आदित्य ठाकरेंनी ‘लाज वाटली पाहिजे’ म्हणताच मुनगंटीवार संतापले

आदिवासी भागात कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यूंवरुन विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं चित्र पहायला मिळालं. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आदिवासी भागातील स्थिती पाहता लाज वाटली पाहिजे असं म्हणताच भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. यानंतर जयंत पाटील यांनी त्यांना विधानाचा नेमका अर्थ समजावून सांगत सरकारच्या कारभारावर टीका केली. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी ‘लाज वाटली पाहिजे’ हे वाक्य असंसंदीय असल्यास कामकाजातून काढलं जाईल स्पष्ट केलं.

सविस्तर बातमी

13:49 (IST) 25 Aug 2022
अमरावती : समृद्धी महामार्गामुळे पिकांचे नुकसान; २२ शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कडेला असलेल्या भिंतीमुळे शेतकऱ्यांचे वहिवाटीचे रस्ते बंद झाल्याने पिकांचे नुकसान होत आहे. परिणामी, २२ शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. वाचा सविस्तर बातमी…

13:09 (IST) 25 Aug 2022
मुंबई : पोलिसाला चावणारा अटकेत

कांदिवली पूर्व येथे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाच्या हाताचा चावा घेतल्याप्रकरणी समता नगर पोलिसांनी ३६ वर्षीय तरूणाला अटक केली. कांदिवली पूर्व येथील आकुर्ली रोड येथे एक व्यक्ती जखमी असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. बातमी वाचा सविस्तर…

13:08 (IST) 25 Aug 2022
Police Notice to Raj Thackeray : “राज ठाकरे हाजीर हो”, औरंगाबाद पोलिसांची नोटीस

Police Notice to Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांना औरंगाबाद पोलिसांनी नोटीस पाठवून आरोपपत्र दाखल करताना न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. १ मे रोजीच्या औरंगाबाद सभेत राज ठाकरेंनी पोलिसांच्या अटींचा भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल आहे. आता या प्रकरणी आरोपपत्र दाखल होणार आहे. हे आरोपपत्र दाखल होत असताना राज ठाकरेंनी उपस्थित रहावं, असं या नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे.

सविस्तर बातमी…

13:07 (IST) 25 Aug 2022
अभिजीत पाटलांच्या पंढरपूर, उस्मानाबादसह राज्यातील विविध साखर कारखान्यांवर आयकर विभागाचे छापे

उद्योजक अभिजीत पाटील यांच्या पंढरपूरसह राज्यातील इतर साखर कारखान्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. सकाळी साडेसहापासून या कारखान्यांची झाडाझडती सुरू आहे. अभिजीत पाटलांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचं पाठबळ असल्याची चर्चा होती. या बड्या नेत्याला या कारवाईतून लक्ष्य केलं जात असल्याचंही बोललं जातंय.

सविस्तर बातमी…

12:45 (IST) 25 Aug 2022
पुणे : दिल्लीतून बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुली सुखरुप ; हॅाटेल व्यवस्थापक, रिक्षाचालक आणि पोलिसांची तत्परता

कुटुंबीयांना कोणतीही कल्पना न देता घर सोडून आलेल्या दिल्लीतील तीन अल्पवयीन मुलींना पोलीस, हॅाटेल व्यवस्थापक आणि रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे त्वरीत मदत मिळाली. पोलिसांनी मुलींच्या कुटंबीयांशी संपर्क साधून मुली सुखरुप असल्याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. बातमी वाचा सविस्तर…

12:43 (IST) 25 Aug 2022
विदर्भात मागील सात महिन्यात ८१० शेतकऱ्यांची आत्महत्या

मुंबईतील विधानभवन परिसरात एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने शेतकऱ्यांची विवंचना समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्येचे अधिक प्रमाण असणाऱ्या विदर्भाची आकडेवाbरी राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. गेल्या सात महिन्यात ८१० शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आहे. या काळात एकट्या अमरावती जिल्ह्यात १७५ शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:37 (IST) 25 Aug 2022
टिपू सुलतान म्हणजे ‘मुस्लीम गुंड’, भाजपा आमदाराचं विधान

कर्नाटकमधील भाजपा आमदार के एस ईश्वरप्पा यांनी टिपू सुलतानचा ‘मुस्लीम गुंड’ असा उल्लेख केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यानंतर ईश्वरप्पा यांना धमकीचं पत्र मिळालं आहे. या पत्रामध्ये त्यांना जर पुन्हा टिपू सुलतानचा ‘मुस्लीम गुंड’ म्हणून उल्लेख केला तर जीभ कापू असं धमकावण्यात आलं आहे. हे पत्र त्यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आलं आहे.

सविस्तर बातमी

12:20 (IST) 25 Aug 2022
पुणे/लोणावळा : ‘द्रुतगती’वरील अपघात रोखण्याच्या योजना कागदावरच ; चालकांचे नियमांकडे आणि यंत्रणांचे व्यवस्थेकडे दुर्लक्ष

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाढत्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने या मार्गावर वाहतूक नियंत्रणाची अद्ययावत यंत्रणा उभारणे आणि मार्ग आठपदरी करण्याचे राज्य शासनाने जाहीर केले. बातमी वाचा सविस्तर…

12:14 (IST) 25 Aug 2022
चंद्रपूर : संतप्त आदिवासी शेतकऱ्यांनी ठोकले विदर्भ कोंकण बँकेला कुलूप

कर्जासाठी टाळाटाळ करणाऱ्या विदर्भ कोंकण बँकेच्या जिवती तालुक्यातील शाखेला संतप्त आदिवासी शेतकऱ्यांनी कुलूप ठोकून आंदोलन सुरू केले आहे. श्रमिक एल्गार, बिरसा संघटना व ऑफ्रोट संघटनांच्या संयुक्त नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:05 (IST) 25 Aug 2022
चंद्रपूर : अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश

चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर विसापूर गावालगतच्या बॉटनिकल गार्डन जवळ रात्री ९ वाजताच्या सुमारास बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. वाचा सविस्तर बातमी…

12:00 (IST) 25 Aug 2022
पुणे : विश्रांतवाडीत ‘डीआरडीओ’ संस्थेत बिबट्या

विश्रांतवाडीतील लष्कराच्या संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) आवारात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले. संस्थेच्या आवारात बिबट्याचा वावर असल्याचे चित्रीकरणात आढळून आल्यानंतर परिसरात घबराट उडाली. बातमी वाचा सविस्तर…

11:44 (IST) 25 Aug 2022
भंडारा : सुस्थितीत आणि वापरातील शौचालय पालिकेने केले जमीनदोस्त

एकीकडे सरकार स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील घराघरात शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करते, मात्र भंडारा शहरात उलटेच घडले. सुस्थितीत आणि वापरात असलेल्या शौचालयावर पालिकेने बुलडोझर चालविला. शुक्रवारी प्रभागातील ३५ ते ४० वर्ष जुने सार्वजनिक शौचालय पालिकेने नोटीस न देताच जमीनदोस्त केले. या प्रकारानंतर बराच वेळ परिसरात तणावाचे वातावरण होते. संतप्त महिलांनी बुलडोझर अडविण्याचा प्रयत्न केला. विरोध करणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाचा सविस्तर बातमी…

11:40 (IST) 25 Aug 2022
पुणे : शहराला दहा महिने पुरणाऱ्या पाण्याचा खडकवासला धरणातून अद्यापही ८५६० क्सुसेकने विसर्ग सुरू

खडकवासला धरणातून मुठा नदीत यंदाच्या हंगामात आतापर्यंत तब्बल १४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडून देण्यात आले आहे. महानगरपालिकेकडून दरवर्षी १६ ते १७ टीएमसी पाणी वापरण्यात येते. त्यानुसार शहराला दहा महिने पुरेल एवढे पाणी आतापर्यंत नदीत सोडून देण्यात आले आहे. बातमी वाचा सविस्तर

11:26 (IST) 25 Aug 2022
पिंपरीतील राजकीय सत्तासंघर्षात नव्या आयुक्तांनाही तारेवरची कसरत

राजकीय पक्षांच्या सत्तासंघर्षात आयुक्तांची कोंडी होण्याची पिंपरी पालिकेची जुनीच परंपरा आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावरच शहरात दाखल झालेले, नवे आयुक्त शेखर सिंह यांनाही या ठिकाणी काम करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. वर्चस्ववाद, श्रेयवाद, पालिकेचे राजकारण व अर्थकारणातून प्रामुख्याने गेल्या आठ वर्षात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने समोरासमोर आले आहेत. त्यामुळे अनेक घटकांची वेळोवेळी कोंडी झाली आहे. वाचा सविस्तर बातमी…

11:01 (IST) 25 Aug 2022
महाराष्ट्राचे प पू…,” ‘युवराजांची ‘दिशा’ चुकली’, शिंदे गटातील आमदारांची आदित्य ठाकरेंवर टीका

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले असून बुधवारी आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने वाद विकोपाला पोहोचला होता. विरोधकांकडून होणाऱ्या आंदोलनांमध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरे सहभाग घेत असल्याने सत्ताधारी आमदारांकडून त्यांना लक्ष्य केलं जात आहे. त्यातच आज आमदारांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवणारं बॅनर हातात घेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवरुन त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. या पोस्टरमध्ये ‘महाराष्ट्राचे परम पूज्य (प पू) युवराज’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

सविस्तर बातमी

11:01 (IST) 25 Aug 2022
“मंत्रीपद गेलं तरी मला काही फरक पडत नाही”, गडकरींच्या ‘त्या’ वक्तव्याची चर्चा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. राजकारणात असतानाही नितीन गडकरी अनेकदा निर्भीडपणे आपलं मत मांडत असतात. याची प्रचिती याआधीही अनेकदा आली असून, नुकतंच पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी कुपोषणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी एक जुना किस्सा सांगताना आपण कशा प्रकारे अधिकाऱ्यांना ‘मंत्रीपद गेलं तरी काही फरक पडत नाही’ सांगितलं होतं याची आठवण सांगितली.

सविस्तर बातमी

11:01 (IST) 25 Aug 2022
नागपूर : प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच दिली प्रियकराला सुपारी

प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने ४० हजार रुपयांत सुपारी दिली. कटानुसार केलेल्या चाकूहल्ल्यात पती बचावल्यामुळे पत्नीचे खरे रूप उघड झाले. या प्रकरणी पत्नीसह चौघांना पोलिसांनी अटक केली. वाचा सविस्तर बातमी…

11:00 (IST) 25 Aug 2022
दापोलीमध्ये दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात, २५ प्रवासी जखमी

रत्नागिरीमधील दापोलीमध्ये दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले आहेत. बसचा चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमींमध्ये महिला आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दापोली उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बसचं स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

10:06 (IST) 25 Aug 2022
युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनीच रशियाचा रॉकेट हल्ला, २२ जणांचा मृत्यू

Russia missile strike on ukraine railway station: २४ ऑगस्ट रोजी युक्रेनचा ३१ वा स्वातंत्र्यदिन होता. रशियाच्या नेतृत्वाखालील सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनियन नागरिकांनी २४ ऑगस्ट रोजी अनेक ठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा केला. स्वातंत्र्यदिनी रशिया युक्रेनवर मोठा हल्ला करू शकतो, अशी शक्यता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी मंगळवारी व्यक्त केली होती. सविस्तर बातमी

10:04 (IST) 25 Aug 2022
“हा हनिमून आणखी किती दिवस…” सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर खोचक टीका!

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन जवळपास दोन महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले नाहीत. त्यामुळे जिल्हास्तरावर अनेक प्रश्नांचा खोळंबा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. या नवीन सरकारचा हनिमून आणखी किती दिवस टिकणार आहे, हेच मला कळत नाही, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. सविस्तर बातमी

shinde vs thackeray supreme court hearing today

अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.

ताज्या बातम्या