Maharashtra News Live Updates 31 May 2022 : राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. संभाजीराजे छत्रपतींनी उमेदवारी मागे घेतली असली तरी त्यांच्या उमेदवारीच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप केला जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिमल्यामधील गरीब कल्याण रॅलीकडेही देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. सत्तेत आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांच सार्वजनिक मंचावरुन भाष्य करणार आहे. तर दुसरीकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी (ता. जामखेड) येथे मंगळवारी (दि. ३१) होणाऱ्या अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार प्रदीर्घ काळानंतर उपस्थित राहणार आहेत. त्यांचे नातू व कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना निमंत्रित केले आहे. त्याच वेळी शरद पवार यांच्यावर सातत्याने हल्लाबोल चढवणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही जयंतीदिनी चौंडीत होणार आहे. पवार व पडळकर हे विरोधक एकाच ठिकाणी येत असल्याने संघर्ष अटळ ठरण्याची चिन्हे आहेत.
येस बँक आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमि.च्या (डीएचएफएल) माध्यमातून करण्यात आलेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कोठडीवर विशेष सीबीआय न्यायालय आज निर्णय देणार आहे. करोनासंदर्भातील आकडेवारीही थोडी चिंतेत टाकणारी आहे. सोमवारी राज्यात करोनाचे ४३१ नवे रुग्ण आढळले असून शून्य मृत्यूची नोंद झाली. मुंबईतील दैनंदिन करोना रुग्णसंख्या ३०० च्या पुढे गेली असून सोमवारी ३१८ नवीन रुग्णांची नोंद झाली. रुग्णांना लक्षणे नसली तरी रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे रुग्णवाढीचा दर वाढला असून रुग्ण दुपटीचा कालावधी कमी झाला आहे. हे आणि असे अनेक विषय चर्चेत आहेत.
अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.
Maharashtra Latest News Updates : राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तसंच इतर क्षेत्रातील सर्व घडामोडी जाणून घ्या
राज्यात पुन्हा एकदा करोनाबाधित रूग्ण आढळत आहेत. आज दिवसभरात ७११ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,८७,०८६ एवढी झाली आहे. वाचा सविस्तर माहिती...
पंजाबमधील प्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्यावर मानसा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी मुसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुसेवाला यांचे हजारो चाहते तसेच राजकीय, मनोरंजन क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. वाचा पूर्ण बातमी
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट असलेले मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे विदेशी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. बँक ऑफ बडोदानं भारतीय कंपन्यांनी घेतलेल्या विदेशी कर्जाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आकडेवारीच्या आधारे असं म्हटलं आहे की, भारतीय कंपन्यांनी घेतलेल्या एकूण विदेशी कर्जात अंबानी आणि अदानी यांच्या कंपन्यांचा वाटा २० टक्के इतका आहे. सविस्तर बातमी
अडीच हजार रुपयांसाठी ओला चालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना ठाण्यामध्ये उघडकीस आलीय. ठाण्यातील शिळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. ठाण्यातील दिवा परिसरातील खर्डी रोडवर हे हत्याकांड घडलं असून या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलीय. येथे वाचा सविस्तर वृत्त
पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशय असल्याने महिलेने पाच गुंडांना महिलेवर सामूहिक बलात्कार करायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार महिलेने आरोपींना मोबाइलमध्ये रेकॉर्डदेखील करायला सांगितला होता अशी माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे. हैदराबादमधील कोंडापूर येथील श्रीरामनगर कॉलनीत २६ मे रोजी ही घटना घडली आहे.
नैऋत्य मोसमी पावसाने नुकताच भारतात प्रवेश केला असताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी (३१ मे) जून ते सप्टेंबर या कालावधीतील मोसमी पावसाचा अंदाज जाहीर केला. त्यानुसार देशात यंदा सरासरीच्या तुलनेत १०३ टक्के म्हणजे सर्वसामान्य पाऊस पडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सविस्तर बातमी
गुजरात राज्यातील पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. काँग्रेसमधील शीर्ष नेते तसेच गुजरातमधील स्थानिक नेत्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत हार्दिक पटेल यांनी हा निर्णय घेतला होता. वाचा पूर्ण बातमी
नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सुरेश भट सभागृहात ५२ प्रभागांतील महिलांच्या अनुसूचित जाती, जमाती व सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षणाची सोडत काढली. २०११ च्या लोकसंख्येनुसार प्रभागांमधील अनुसूचित जाती, जमातींची संख्येच्या आधारावर आरक्षण काढण्यात आले. महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असून यातून अनुसूचित जाती, जमाती व सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण काढण्यात आले.
“योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या.”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. वाचा सविस्तर बातमी...
“आहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडीला नेहमी कुठलाही पक्ष अभिनिवेश न ठेवता साजरी केली जाते. सर्व प्रकारचे लोक त्या ठिकाणी येतात. पण मला असं वाटतं की यावेळी सरकारी तंत्राचा उपयोग करून, या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी हायजॅक करण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. हे अत्यंत चुकीचं आहे.” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर...
राज्य निवडणूक आयोगाने १४ महापालिकांना प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाअंतर्गत पुणे महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. पुणे महापालिकेतील 58 प्रभागातील 173 जागांसाठी ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. वाचा पूर्ण बातमी
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ महापालिकांना प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाअंतर्गत आज मुंबई महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीनुसार बेस्टचे माजी अध्यक्ष आशिष चेंबुरकर यांचा वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. वाचा पूर्ण बातमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिमला येथील रॅलीला संबोधित करताना भारतीय सीमारेषेबाबत मोठं विधान केलं आहे. २०१४ च्या तुलनेत आता भारतीय सीमारेषा अधिक सुरक्षित असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, "मी देशाचा पंतप्रधान नसून देशातील जनतेचा प्रधान "सेवक" आहे. आणि यावर माझा ठाम विश्वास आहे." यावेळी त्यांनी भाजपा सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या ‘गरीब कल्याण संमेलन’मध्ये विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी देखील संवाद साधला. सविस्तर बातमी
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने मंगळवारी राज्यातील महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ओबीसी वगळता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. त्यामुळे कोणता वॉर्ड आरक्षित होतो, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले होते. मुंबईसह पुण्यात महापालिकेच्या जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. वाचा सविस्तर...
जेवण करण्याचा कंटाळा आलाय किंवा तेच तेच पदार्थ नको म्हणून आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी मॅगीवर एखाद्या दिवशीचं रात्रीचं किंवा दुपारचं जेवण नक्कीच केलं असणार. मात्र याच मॅगीमुळे आयुष्य बदलून टाकणाऱ्या एका निर्णयापर्यंत एक जोडपं पोहचलंय असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. एका व्यक्तीने त्याची पत्नी त्याला दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात रोज मॅगीच खायला देते म्हणून चक्क घटस्फोटाचा अर्ज केला आणि नंतर तो मंजूरही झाला. तुम्हाला हे वाचून गंमत वाटली असेल मात्र खरोखर असा प्रकार घडलाय कर्नाटकमध्ये!
https://twitter.com/LoksattaLive/status/1531550391250612224
शेतात काम करण्यासाठी गेलेल्या शेतमजुरावर काटवन येथील कक्ष क्रमांक ७५६ मधील नाल्याजवळ वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना मंगळवारी (३१ मे) सकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडली. रामभाऊ कारु मरापे (४३) असे मृत्यू झालेल्या शेतमजुराचं नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या चमुने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
काँग्रेसचे प्रदेश महासचिव आशिष देशमुख यांनी काँग्रेसच्या राज्यसभा यादीवर तीव्र आक्षेप घेतलाय. यात उत्तर प्रदेशमधून इम्रान खान उर्फ प्रतापगडी, पी. चिदंबरम आणि प्रमोद तिवारी यांच्या उमेदवारीवर त्यांनी विशेष आक्षेप घेतले. यावरूनच त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव घेत काँग्रेस नेत्यांना कव्वाली, शायरी, मुशायरे शिकवावेत, अशी घणाघाती टीका केली.
काँग्रेसचे प्रदेश महासचिव आशिष देशमुख यांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेल्या इम्रान खान उर्फ प्रतापगडी यांना काँग्रेसने महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल नाराज व्यक्त केली. तसेच माजी आमदार डॉ. अशिष देशमुख यांनी आपल्या काँग्रेस प्रदेश महासचिव पदाचा राजीनामा देण्याचं जाहीर केलं.
माजी आमदार व काँग्रेस नेते डॉ. आशिष देशमुख यांनी उत्तर प्रदेशचे नेते इम्रान प्रतापगडी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर काँग्रेसने उमेदवारी दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आणि महाराष्ट्रातील कर्तबगार नेत्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे.
महागड्या बाईक चोरून हौस मौज करणे एका गॅरेज मॅकेनिकला चांगलेच महागात पडले आहे. बुलेट चोरी प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी या गॅरेज मॅकेनिकला अटक केली आहे. राज तावडे असं या चोरट्याचं नाव आहे. त्याच्याकडून चोरी केलेल्या पाच दुचाक्या पोलिसांनी हस्तगत केल्या असून चार गुन्ह्यांची उकल झाली आहे.
मद्यप्राशन करून दंगा केल्याने चौकशीसाठी आणलेल्या तरुणाने पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पलूस पोलीस ठाण्यात ही घटना घडली.पोलिसांच्या मदतीसाठी मोफत असणाऱ्या ११२ नंबरवर सातत्याने अतुल शंकर भोसले हा फोन करत होता. मला ठाण्यात नेण्यासाठी गाडी पाठवा असे तो मोफत सुविधा असलेल्या नंबरवर सांगत होता. पोलिसांनी त्याला ठाण्यात बोलावले व विचारणा केली असता त्यांने पलायन केले. परत पकडून आणले असता अंगावरील शर्टने गळफास लाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यापासून परावृत्त करून कोठडीत ठेवले. तेथेही लोखंडी ग्रीलवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये तो जखमी झाला असून रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार प्रदीर्घ काळानंतर उपस्थित राहत आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना निमंत्रित केलं आहे. दरमयान यावेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही चौंडीत होणार आहे. मात्र पोलिसांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना रोखलं असून यामुळे रस्त्यावरच समर्थक आणि पोलिसांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.
सविस्तर बातमी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मागील काही काळापासून पायाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांनी स्वत:च पुण्यातील सभेतून याबाबत माहिती दिली होती. तसेच लवकरच पायाची शस्त्रक्रिया करणार असल्याचंही राज ठाकरे म्हणाले होते. आता ते शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. सविस्तर बातमी
जम्मू काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून सामान्य नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यात वाढ झाली आहे. १२ मे रोजी बडगाम जिल्ह्यात महसूल विभागाचे कर्मचारी राहुल भट यांची अतिरेक्यांनी गोळी घालून हत्या केली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात, बडगामच्या चदूरा भागात लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यानं अंदाधुंद गोळीबार करत टीव्ही कलाकार अमरीन भटचा खून केला होता. या घटना ताज्या असताना आता जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आणखी एक दहशतवादी हल्ल्याची घटना समोर आली आहे. सविस्तर बातमी
पनवेल तालुका पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये येणाऱ्या मौजे वाजे गावातील येथील सलमान खानच्या ‘अर्पिता फार्म’ शेजारी पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. येथे क्लिक करुन जाणून घ्या नेमकं घडलंय तरी काय...
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नुकतेच सत्तेचे अडीच वर्षे पूर्ण केले आहेत. मात्र अद्यापही तिन्ही पक्षांपमध्ये धुसफूस कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. असे असले तरी तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते सर्व काही ठिक असल्याचे कायम सांगत आले आहेत. अशात आता मुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक विधान केले आहे. यावरुन आता महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
उत्तर प्रदेशातील वाराणसीमधील ज्ञानवापीमध्ये कोर्टाच्या आदेशानुसार १४ मे ते १६ मे दरम्यान करण्यात आलेल्या सर्व्हेचे व्हिडीओ सोमवारी (३० मे) हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांना सोपवण्यात आले. दरम्यान या सीडीमधील काही व्हिडीओ लीक झाल्याचा आरोप हिंदू पक्षकारांनी केला आहे. याप्रकरणी मंगळवारी कोर्टाकडे तक्रार दाखल करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. या व्हिडीओंमध्ये शिवलिंग, त्रिशूल अशी चिन्हं दिसल्याचा दावा करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिमल्यामध्ये 'गरीब कल्याण संमेलना'त सहभागी होणार आहेत. मोदी सरकारला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही सभा आयोजित करण्यात आली असून मोदी यावेळेस सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. मात्र मोदींच्या यासभेसाठी शिमल्यामधील शाळाही बंद ठेवण्यात आल्याची माहिती समोर आलीय. येथे वाचा सविस्तर वृत्त
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत सातारा आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. इतरही काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मान्सून पूर्व सरी कोसळल्या आहेत. आज दक्षिण महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने पिवळा इशारा दिला आहे. सविस्तर बातमी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वजन वाढलेल्या आपल्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. बैठकीत सहभागी झालेल्या या कार्यकर्त्यामधील आणि ममता बॅनर्जींमधील संवादाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून चांगलाच चर्चेत आहे. कार्यकर्ता बोलत असताना ममता बॅनर्जी यांनी त्यांना थांबवत, “ज्याप्रकारे तुमचं पोट वाढत चाललं आहे ते पाहता कधीही खाली कोसळू शकता, तुम्हाला बरं वाटत नाहीये का?,”अशी विचारणा केली.
अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.