Marathi News Updates : कल्याणमध्ये पोलीस ठाण्यात घडलेल्या गोळीबार प्रकरणाने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच राज्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांवरून विरोधी पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. यासंदर्भातल्या बातम्या आज पाहायला मिळू शकतात. त्याचबरोबर जम्मू काश्मीर, लडाखमधील आंदोलनं, ईव्हीएम मशीनविरोधात ठिकठिकाणी चालू असलेली आंदोलनं, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’संदर्भातल्या बातम्यांवर आपलं लक्ष असेल. राहुल गांधींची पदयात्रा सध्या बिहारमधून जात आहे.

Live Updates

Maharashtra Live News Today 06 February 2024 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या

18:32 (IST) 6 Feb 2024
पालकमंत्र्यांकडून पौषवारी यात्रोत्सवातील सुविधांची पाहणी

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या पौषवारी यात्रेनिमित्त पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते मंगळवारी पहाटे महापूजा करण्यात आली. यावेळी भुसे यांच्या हस्ते पहिला पूजेचा मान मिळालेल्या राहता येथील वारकरी दाम्पत्य मोहन धानेकर यांचा सन्मान करण्यात आला.

महापूजेनंतर पालकमंत्री भुसे यांनी पौषवारीनिमित्त यात्रास्थळाची तसेच यात्रेस आलेल्या वारकरी व भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी- सुविधांची पाहणी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊ दे, अशी प्रार्थना केली. दिंड्यांची आणि वारकऱ्यांची संख्या वाढल्याने भाविकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संस्थानाच्या विकासापासून ते वारकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पहिल्यांदाच आढावा बैठक घेतल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

17:13 (IST) 6 Feb 2024
वडिलांच्या मृत्यूमुळे कैद्याने मागितली ७ दिवसांची सुट्टी, मिळाली १ दिवस, उच्च न्यायालय म्हणाले…

नागपूर : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याने वडिलांच्या मृत्यूमळे ७ दिवसांचा पॅरोल मागितला, मात्र कारागृह प्रशासनाने एक दिवसाचा पॅरोल मंजूर केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कारागृह प्रशासनाचा निर्णय चुकीचा ठरवत कैद्याला सात दिवसांचा पॅरोल मंजूर करण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती विनय जोशी आणि वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

सविस्तर वाचा…

16:44 (IST) 6 Feb 2024
पाय गमावल्यानंतरही फिनिक्स भरारी घेत जगदीशची पॅराऑलिम्पिकची तयारी

मोटारसायकल अपघातामध्ये पाय गमावल्यानंतर अंधकारमय झालेले आयुष्य, तीन बहिणींची जबाबदारी यातून नैराश्याच्या गर्तेत जात असलेला जगदीश ठाकरे (२८) या तरुणाला जी.टी. रुग्णालयाच्या समाजसेवा विभागाकडून कृत्रिम पाय मिळाला. सविस्तर वाचा

16:41 (IST) 6 Feb 2024
सासवडमधील तहसीलदार कार्यालयातून मतदान यंत्र चोरीला; सगळा प्रकार ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांत कैद

सासवडमधील तहसीलदार कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ईव्हीएम यंत्र चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. इव्हीएम यंत्र चोरणाऱ्या चोरट्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपले आहे. ग्रामीण पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. सविस्तर वाचा

16:39 (IST) 6 Feb 2024
कोल्हापूर तालीम संघाचे मुख्य संरक्षक, वस्ताद बाळ गायकवाड यांचे निधन

नव्या दमाचे कुस्तीगीर तयार करणारे वस्ताद, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे मुख्य संरक्षक बाळ तथा बाळासाहेब राजाराम गायकवाड यांचे मंगळवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. कुस्तीतील भीष्माचार्य असा त्यांचा लौकिक होता. सविस्तर वाचा

16:29 (IST) 6 Feb 2024
महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार महिलांविरोधी

जळगाव : आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक आणि मदतनीसांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी उडी घेत सरकारवर टीका केली आहे.

सविस्तर वाचा…

16:26 (IST) 6 Feb 2024
नवी मुंबई : ५० फुटांवर दोन बस बंद पडल्याने वाहतूक कोंडी

नवी मुंबई : वाशी कोपरखैरणे मार्गावर एन.एम.एम.टी च्या दोन बस केवळ ५० फुटांच्या अंतरावर बंद पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. दोन तासांच्या प्रयत्नांनी बस रस्त्याच्या कडेला घेण्यात आल्यावर वाहतूक कोंडीतून सुटका झाली.

वाचा सविस्तर…

16:25 (IST) 6 Feb 2024
शिवाजी विद्यापीठाच्या युवासंसदेचा संसदीय कार्यमंत्रालयात सत्कार होणार

कोल्हापूर : केंद्रीय संसदिय कार्यमंत्रालयाच्यावतीने शिवाजी विद्यापीठाच्या युवासंसदेच्या संघाचा समुह स्तरावर प्रथम क्रमांक आल्याबद्दल नवी दिल्ली येथे समन्वयक डॉ.प्रल्हाद माने आणि आठ बक्षिस प्राप्त विध्यार्थ्यांना पारितोषिकाने सन्मानित करण्यात येणार असल्याचे मंगळवारी सांगण्यात आले.

विध्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची मुल्ये रूजावीत यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. शिवाजी विद्यापीठातील ५५ विध्यार्थ्यांच्या संघाने २३ मे रोजी झालेल्या स्पर्धेत सहभाग घेऊन प्रश्न तास, विशेषाधिकाराचा भंग, वैधानिक कामकाज, विधेयक सादर करणे इ. संसदीय कार्यप्रणालीतील विषयासह स्वच्छ भारत, कृषी, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्ष्मीकरण, नवीन शैक्षणिक धोरण, आर्थिक धोरण, संरक्षण इ. संदर्भाने युवा संसदेमध्ये अभ्यासपूर्ण चर्चा केली होती.

१६ फेब्रुवारीरोजी संसदिय कार्यमंत्रालयाचे राज्य मंत्री अर्जुनलाल मेघवाल यांच्या अध्येक्षतेखाली बक्षिस वितरण संसदेच्या आवारातील बालयोगी समभागृहामध्ये होणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे युवा संसदेचे समन्वयक डॉ.प्रल्हाद माने आणि अनमोल पाटील, आसिया जमादर, श्रेया म्हापसेकर, पवन पाटील, साईसिमरन घाशी, प्रतीक्षा पाटील, रुतिका धनगर, प्रतिक्षा कांबळे या विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. डी. टी शिर्के, प्र-कुलगुरु प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे ,संचालक डॉ. पी. टी. गायकवाड यांनी युवासंसदेचे अभिनंदन केले.

16:17 (IST) 6 Feb 2024
“महायुतीचा १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा”, काँग्रेसचा मोठा आरोप

विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की, महायुती सरकारमध्ये दोन अलिबाबा आणि ८० चोर आहेत. ज्यांची पैसे खाण्याची भूक आता प्रचंड वाढली आहे. लोकसभा आचारसंहितेअगोदर सरकारी तिजोरी लूटून आपली तिजोरी भरून घेण्यासाठी अनेक शकला लढवल्या जात आहेत. सत्तेसाठी पैसा आणि पैशातून सत्ता हे या महायुती सरकारचं ब्रिदवाक्य आहे. राज्यात आठ हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा गाजत असताना सरकारने आता नवीन मोबाईल घोटाळा केला आहे. मर्जीतल्या कंपनीकडून १५५ कोटी रूपयांचे मोबाईल खरेदी करण्याचा सरकारचा इरादा आहे. त्याचबरोबर निवडणुका डोळ्यासमोर मतं मिळवण्यासाठी अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना सरकार साड्या वाटणार आहे. हा घोटाळा देखील १०० कोटींच्या वर आहे. या दोन्ही घोटाळ्यातील वाटा मंत्री आणि सरकारला मिळणार आहे.

“मोबाईल द्यायचा असेल तर सरकारने अंगणवाडी सेविकांच्या खात्यात थेट पैसे जमा करावेत. अंगणवाडी सेविकांना हवा तो मोबाईल घेण्याची मुभा द्यावी. मग भ्रष्टाचार होणार नाही. अंगणवाडी सेविका प्रामाणिक आहेत. त्यांच्यावर सरकारचा विश्वास नाही का?”

15:44 (IST) 6 Feb 2024
पुणे: कोंढव्यात अकराव्या मजल्यावरील सदनिकेत आग

कोंढवा परिसरात एका बहुमजली इमारतीत अकराव्या मजल्यावर असलेल्या सदनिकेत मंगळवारी दुपारी आग लागली. आग लागल्यानंतर रहिवासी भयभीत झाली. इमारतीच्या गच्चीवर रहिवासी पळाले. सविस्तर वाचा…

15:43 (IST) 6 Feb 2024
बुलढाणा : ‘बंटी बबली’ पोलिसांच्या जाळ्यात, खामगावातील एकाला घातला होता गंडा

बुलढाणा : जिल्ह्यातील खामगाव येथील एकाची दोन लाख 4 हजार रुपयांनी ‘ऑनलाईन’ फसवणूक करणाऱ्या मध्यप्रदेशातील ‘बंटी- बबली’ला बुलढाणा सायबर पोलिसांनी गजाआड केले! चंदा मनोज सोळंकी (४२, रा. इन्दूर) आणि तरुण पंकज खरे (रा. भोपाळ) अशी आरोपींची नावे आहे.

सविस्तर वाचा…

15:08 (IST) 6 Feb 2024
‘सोशल मीडिया’वर आक्षेपार्ह मजकूर टाकणे सहायक फौजदाराला भोवले…

बुलढाणा : समाजमाध्यमावर कार्यकर्ते वा नागरिकांनी आक्षेपार्ह मजकूर टाकण्याच्या घटना आपण वाचतो. मात्र, एका पोलीस कर्मचाऱ्याने असा मजकूर टाकल्याचे निदर्शनास आले असून त्याला तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा…

15:07 (IST) 6 Feb 2024
निवडणूकपूर्व बदल्यांच्या नियमांना नागपुरात तिलांजली

नागपूर : निवडणुका पारदर्शी व्हाव्या म्हणून तीन वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या किंवा जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या अधिकाऱ्यांना इतरत्र स्थानांतरित करण्याचे निवडणूक आयोगाचे नियम असताना त्याला नागपूरमध्ये तिलांजली दिली जात असल्याचे काही आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांबाबत दिसून येते.

सविस्तर वाचा…

15:06 (IST) 6 Feb 2024
VIDEO : वाघांचा मॉर्निंग वॉक, अन तो ही असा शिस्तीत… पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या व्हिडीओची चर्चा

नागपूर : कोण म्हणतं फक्त ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांकडेच पर्यटकांना आकर्षित करण्याचं सामर्थ्य आहे. याच व्याघ्रप्रकल्पातील वाघांना करामती करता येतात. राज्यातील इतर अभयारण्य आणि त्यातील वाघांच्या करामतीसुद्धा तेवढ्याच दमदार आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात पहाटे पहाटे एक-दोन नाही तर चक्क चार-चार वाघांनी अगदी शिस्तीत ‘मॉर्निंग वॉक’ करत पर्यटकांना मेजवानी दिली.

सविस्तर वाचा…

14:41 (IST) 6 Feb 2024
उरण नगर परिषदेचे कार्यालय आचारसंहितेत अडकणार?

उरण : उरण नगर परिषदेच्या अद्यायावत प्रशासकीय इमारतीचे बांधकाम येत्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे, की आचारसंहितेत अडकणार, अशी शंका व्यक्त केली जात आहे. ६.५० कोटी खर्चातून उभारण्यात आलेल्या या कार्यालयाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र लोकसभेसाठी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असल्याने कार्यालय पूर्ण होऊनही अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

वाचा सविस्तर…

14:39 (IST) 6 Feb 2024
नवी मुंबईतील ४५०० अनधिकृत बांधकामे पाडणार?

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात अनधिकृत बांधकामांचे पेव मोठ्या प्रमाणात फुटले असूनशहरी भागासह, मूळ गावठणाभोवती अनधिकृत बांधकामांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. नुकतीच नेरुळ सेक्टर १६ येथे पालिकेच्या उद्यानाच्या भूखंडावर झालेल्या अनधिकृत इमारती खाली करण्यात आल्याची कारवाई ताजी असतानाच उच्च न्यायालयाने ३१ डिसेंबर २०१५ आधीची आणि नंतरची किती बेकायदा बांधकामे बांधली गेली आहेत याचे सर्वेक्षण करा तसेच २०१५ नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेला दिले आहेत.

वाचा सविस्तर…

13:54 (IST) 6 Feb 2024
प्रेमसंबंधातून टिटवाळ्यातील तरूणाचे अपहरण करून ठार मारण्याचा प्रयत्न

कल्याण : टिटवाळा येथील एका तरूणाचे जातीबाह्य मुलीबरोबर पाच वर्षापासून प्रेमसंबंध होते. मुलीच्या कुटुंबीयांना हे प्रेमसंबंध मान्य नव्हते. मुलगी या मुलाशीच विवाह करण्याच्या विचारात असल्याने मुलीच्या कुटुंबियांनी प्रेमसंबंध ठेवणाऱ्या तरुणाचे अपहरण केले. त्याला भिवंडी जवळील पडघा येथील जंगलात नेऊन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

वाचा सविस्तर…

13:50 (IST) 6 Feb 2024
नाशिक : युवतीवर प्राणघातक हल्ला, आरोपीला पाच वर्ष तुरुंगवास

नाशिक : लग्नास नकार दिल्याने ओझर येथील युवतीवर कात्रीने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सागर गायकवाड या आरोपीस निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. पवार यांनी पाच वर्ष कठोर तुरुंगवासासह ५४ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सविस्तर वाचा…

13:39 (IST) 6 Feb 2024
मराठा आरक्षणासाठी १५ फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावणार? मंत्री दीपक केसरकर म्हणाले…

मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य पातळीवर सर्वेक्षण चालू आहे. हे सर्वेक्षणाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. त्यामुळे आता चर्चा आहे की, येत्या १५ फेब्रुवारीला विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलं जाईल आणि मराठा आरक्षणावर तोडगा काढला जाईल. याबाबत मंत्री दीपक केसरकर म्हणाले, मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी चालू असलेलं सर्वेक्षण पूर्ण होत आलं आहे. हे सर्वेक्षण मागासवर्ग आयोगाकडे गेलं आणि त्यावरील मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर आम्ही ताबडतोब विधानसभेचं अधिवेशन बोलावणार आहोत.

13:26 (IST) 6 Feb 2024
दोन मित्रांनी अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून केली हत्या

मुलुंड पश्चिम येथे दोन अल्पवयीन मुलांनी चाकूने भोसकून मित्राची हत्या केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. दोन्ही मुलांची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. हत्येनंतर दोन चाकू हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. सविस्तर वाचा…

13:26 (IST) 6 Feb 2024
फलकबाजीमुळे डोंबिवली शहराचे विद्रुपीकरण, रेल्वे स्थानक भागात फेरीवाल्यांकडून कचरा

डोंबिवली : डोंबिवली शहराच्या मुख्य वर्दळींच्या रस्त्यावर कार्यक्रमांची प्रसिद्धी करणाऱ्या कमानी, शहरांच्या कोपऱ्यांवर फलक लावून काही संस्थांनी शहराचे विद्रुपीकरण केले आहे. या फलकांवर पालिकेकडून कारवाई होत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

वाचा सविस्तर…

13:21 (IST) 6 Feb 2024
महिलांच्या हितासाठी कौटुंबिक अत्याचाराचे ४९८ ए कलम दंडात्मक करू शकत नाही, भूमिकेचा केंद्र सरकारतर्फे उच्च न्यायालयात पुनरूच्चार

महिलांचे हित लक्षात घेता हुंडा किंवा अन्य मागण्यांसाठी पती आणि त्याच्या नातेवाईकांकडून महिलेवर केलेल्या अत्याचारांशी संबंधित भारतीय दंड संहितेचे कलम ४९८ए हे कारावासाऐवजी दंडात्मक शिक्षेचे करू शकत नाही, या आपल्या भूमिकेचा केंद्र सरकारने उच्च न्यायालयात पुनरूच्चार केला. सविस्तर वाचा…

13:19 (IST) 6 Feb 2024
तारापूर प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न; पुनर्वसनाचा धोरणात्मक निर्णय कधी ? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

पालघर येथील तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील विस्थापित ग्रामस्थांना मूलभूत सुविधा मिळण्याचा मुद्दा वर्षानुवर्ष प्रलंबित असल्यावर उच्च न्यायालयाने सोमवारी पुन्हा बोट ठेवले. तसेच, प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचा धोरणात्मक निर्णय कधी घेणार अशी विचारणा राज्य सरकारला केली. सविस्तर वाचा…

13:18 (IST) 6 Feb 2024
‘हिंमत असेल तर स्वत:चा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवा’, जितेंद्र आव्हाडांचे अजित पवारांना खुले आव्हान!

शरद पवार हे जर हुकूमशहा आहेत तर त्यांनी स्थापन केलेला पक्ष आणि त्यांनी देशभर पोहचविलेले निवडणूक चिन्ह वापरून निवडणुका लढविण्याची भाषा का करता, असा प्रश्न उपस्थितीत करत हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करून स्वतंत्र निवडणूक चिन्हावर लढून दाखवा, सविस्तर वाचा…

13:17 (IST) 6 Feb 2024
ठाण्यात ‘ग्रँड सेंट्रल पार्क’ ची उभारणी; काश्मीरच्या मुघल गार्डनसह चिनी, मोरोक्कन, जपानी संकल्पनेवर उद्याने

महापालिकेने बांधीव हस्तांतरण विकास हक्क (कन्स्ट्रक्शन टीडीआर) च्या माध्यमातून कोलशेत परिसरातील सुमारे २०.५ एकर जागेवर ‘ग्रँड सेंट्रल पार्क’ ची उभारणी केली आहे. काश्मीरचे मुघल गार्डन, चायनीज थिमने केलेले उद्यान, मोरोक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे मोरोक्कन थीमचे उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण आहे.

सविस्तर वाचा…

13:16 (IST) 6 Feb 2024
बंदुकीचे सर्वाधिक परवाने ठाणे आणि कल्याण, डोंबिवलीत; बंदूक स्वसंरक्षणासाठी की खोट्या प्रतिष्ठेसाठी ?

उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या परवाना असलेल्या बंदूकीने शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा…

13:15 (IST) 6 Feb 2024
पुण्याचा वाहतूक कोंडीतही झेंडा! जगातील सातव्या क्रमांकाचे वाहतूक कोंडीचे शहर

पुण्यातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. शहरातील वाहनसंख्या वाढत असून, अरुंद रस्ते आणि त्यातच अनेक ठिकाणी सुरू असलेले मेट्रोचे काम यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. सविस्तर वाचा…

13:14 (IST) 6 Feb 2024
मुख्यमंत्र्याची भेट घेणारा निलेश घायवळ कोण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणारा गुंड निलेश घायवळ पुन्हा चर्चेत आला आहे. कोथरुडमधील गुंड गजानन मारणे आणि निलेश घायवळ या दोन टोळ्यांमधील वर्चस्वाच्या वादातून टोळीयुद्ध भडकले होते. दोन्ही टोळ्यांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई केली होती.

सविस्तर वाचा…

13:13 (IST) 6 Feb 2024
नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची छाया गडद, ४३६ गाव वाड्यांना टँकरने पाणी

नाशिक : ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले असून फेब्रुवारीतच पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. टंचाईच्या सावटात सापडलेल्या जिल्ह्यातील १४० गावे, २९६ वाड्यांना टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे.

सविस्तर वाचा…

13:13 (IST) 6 Feb 2024
भाजपाचा पुण्यातील पदाधिकाऱ्यांना आदेश…भिंती रंगवा, प्रचार करा!

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील खासगी भिंती भाजपच्या घोषणा आणि निवडणूक चिन्हाने रंगविण्याचा आदेश शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यानुसार घोषवाक्यांनी भिंती रंगविण्यास सुरुवात झाली असून, भाजपच्या ‘बूथ चलो’ अभियानाचा हा एक भाग असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. सविस्तर वाचा…

13:12 (IST) 6 Feb 2024
पुणे: पोलीस आयुक्तांचा वाहतूक पोलिसांना इशारा; म्हणाले, ‘चिरीमिरी घ्याल तर…’

शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे. वाहतूककोंडी सोडविण्याऐवजी दंडात्मक कारवाई केल्यास खपवून घेतले जाणार नाही. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

सविस्तर वाचा…

13:03 (IST) 6 Feb 2024
मनमाड येथील रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

मनमाड : शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोसळलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरची सर्व प्रकारची वाहतूक पूर्ववत सुरू झाली. त्यामुळे राज्यातील वाहतूकदारांची मोठी समस्या मिटली असून राज्य परिवहन महामंडळाच्या मनमाड आगारातून पूर्वीप्रमाणे नियमित सर्व बस धावू लागल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

वाचा सविस्तर…

12:50 (IST) 6 Feb 2024
नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा निम्म्यावर

नाशिक : फेब्रुवारीच्या प्रारंभी दुष्काळाची तीव्रता अधोरेखीत होत असून जिल्ह्यातील लहान-मोठ्या धरणात ३३ हजा्र ९१३ दशलक्ष घनफूट म्हणजे ५१ टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण ७३ टक्के इतके होते. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या ६५ टक्के जलसाठा आहे.

वाचा सविस्तर…

12:27 (IST) 6 Feb 2024
नवी मुंबई : निर्माणाधीन इमारतीला आग तीन तासांच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण

नवी मुंबई : शिरवणे एमआयडीसीतील एका इमारतीला लागलेली आग तीन तासांच्या नंतर विझवण्यात अग्निशमन दलास यश आले. सोमवारी रात्री नऊ साडे नऊच्या सुमारास टॉवरच्या विसाव्या माळ्यावर आग लागली.

सविस्तर वाचा…

11:53 (IST) 6 Feb 2024
ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्यासाठी २३५ झाडांवर कुऱ्हाड

मुंबई : महत्त्वाकांक्षी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पास अखेर केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या कामासाठी आता २३५ झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे.

सविस्तर वाचा…

11:50 (IST) 6 Feb 2024
नीतेश राणे यांच्या विरोधात फौजदारी कारवाईचा इशारा – मालेगावचा ‘मिनी पाकिस्तान’ उल्लेख प्रकरण

मालेगाव : मालेगाव शहराचा ‘मिनी पाकिस्तान’ असा उल्लेख करणारे भाजप आमदार नीतेश राणे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. शहरवासीयांची माफी न मागितल्यास राणे यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

11:20 (IST) 6 Feb 2024
मुख्यमंत्री आणि गुंडांच्या बैठका घडवणारा माजी पोलीस अधिकारी कोण? राऊत कोणाची पोलखोल करणार?

शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत म्हणाले, गेल्या महिन्याभरात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर ज्या त्यांच्या राजकीय बैठका होतायत, गुंडांच्या टोळ्या त्यांच्या म्होरक्यांबरोबर त्या बैठकांना येत आहेत. त्या बैठकींमध्ये नेमकं काय शिजवलं जातंय? मुंबईतला एक माजी पोलीस अधिकारी हे सगळं घडवून आणतोय. या बैठका आयोजित करतोय. आम्ही लवकरच या अधिकाऱ्याचा पर्दाफाश करणार आहोत. गुंडांच्या टोळ्यांच्या बैठका घेऊन लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये राजकीय विरोधकांना संपवण्याचं अधिकृतपणे षडयंत्र रचलं जातंय. आम्ही त्याचे पुरावे देत आहोत. परंतु, या गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिसणार नाहीत.

उद्धव ठाकरे – एकनाथ शिंदे

“…यातून भाजपाची विकृतीच उघड झाली”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गट- अजित पवार गटाला टोला

उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्र हा शिवरायांचा वारसा सांगतो. तरी स्वतःस मर्द-मऱ्हाटे म्हणवून घेणाऱ्यांनी दिल्लीच्या पायाशी लोळण घेतली व महाराष्ट्राचे नाक कापले. पण झारखंड आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी लढाईसाठी तलवार उपसली आहे. हेमंत सोरेन यांच्या अटकेने भाजपची विकृतीच उघड झाली. जेथे आपली राज्ये नाहीत ती दहशतीच्या बळावर उलथवून टाकायची. ही कोणत्या पद्धतीची लोकशाही? हा कोणता कायदा? हे कसले स्वातंत्र्य?”