कराड : ‘ऑक्टोबर हिट’च्या उष्म्याच्या झळांनी लोक त्रस्त असतानाच अधून, मधून ढग दाटून कराड परिसरात सलग चार दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. काही वेळच्या या जोरदार पावसानंतर पुन्हा कडक उन्ह पडत आहे. हा पाऊस नजीकच्या विभागातही कोसळत असल्याचे वृत्त आहे.

थंडी, उन्ह अन् पाउसही या तिन्हींचा अनुभव देणाऱ्या या विचित्र वातावरणाने संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. सर्दी, ज्वर, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. तर, दुसरीकडे पिकांचेही नुकसान होत आहे.

देशभरातून मोसमी वारे परतल्यानंतर हा मान्सुनेत्तर पाऊस कोसळू लागला आहे. सध्या साखर कारखान्यांचे गळीत सुरू होत असताना, कोसळणाऱ्या या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी होताना ऊसतोडणीला अडथळा निर्माण झाला आहे. ऊसतोड मजुरांचे सर्वत्र हाल होताना दिसत आहे.

कराड व परिसरात उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे घामाच्या धारा सुरू झाल्या असतानाच गेल्या चार दिवसांपासून पुन्हा पाऊस कोसळत आहे. मे महिन्याच्या मध्यांतरापासून मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर सलग साडेपाच महिने कोसळणाऱ्या पावसाने शेतीचे गणित बिघडवले आहे.

ऐन दिवाळीतही पाऊस कोसळल्याने त्याचा दीपोत्सवाच्या आनंदावर विरजण घालणारा हा पाऊस ठरला असून, बाजारपेठांवर त्याचा विपरीत परिणाम झाला. अनेकांची खरेदीची निराशा झाली. व्यापार घटल्याने व्यापारी, व्यावसायिकांचेही आर्थिक नुकसान झाले आहे. या पावसामुळे भुईमूग, ज्वारी, बाजरीचे तसेच काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान होत आहे. साडेपाच महिन्यांपासून कोसळणारा पाऊस थांबता थांबेना, अशी स्थिती असल्याने याबाबत लोकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.