सातारा : क्रीडा महर्षी साहेबराव पवार यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्ताने भारतीय शैली कुस्ती महासंघाच्या मान्यतेने राजेश्वर प्रतिष्ठान सातारा यांच्यावतीने सातारा येथे आजपासून (सोमवार) ते गुरुवार (दि.२३) दरम्यान हिंद केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत ८०० मल्ल सहभागी होणार असल्याची माहिती भारतीय शैली कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय महासचिव गौरव रोशनलाल व निमंत्रक दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धेला ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती निमंत्रक दीपक पवार यांनी दिली. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रीय महासचिव गौरव रोशनलाल अर्जुन अवॉर्ड विजेते गयन सिंग, पैलवान बारणे, खोपडे, सुधीर पवार आदी उपस्थित होते.
पुरुष गटातील हिंद केसरी कृस्ती स्पर्धा ८५ ते १४० किलो वजन गटात होणार आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून २६ राज्याचे पुरुष व महिला संघ उपस्थित राहणार आहेत. सुमारे ५०० पुरुष मल्ल व २५० महिला मल्ल अन्य ५० मल्ल सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा पारंपरिक मातीच्या दोन आखाड्यावर होणार आहे.
स्पर्धेंसाठी राज्यातून ३० व दिल्ली येथून आंतरराष्ट्रीय दर्जाचे ८० पंच येणार असल्याचे गौरव रोशनलाल यांनी सांगितले. या स्पर्धेत आत्तापर्यंतच्या स्पर्धेपेक्षा मोठी बक्षिसे दिली जाणारी हिंदकेसरी देशातील पहिली स्पर्धा आहे. सुमारे ५५ लाख रुपयांची बक्षिसे साहेबराव पवार कुटुंबीयांच्या वतीने दिली जाणार आहेत, अशी माहिती दीपक पवार यांनी दिली. त्याचप्रमाणे भारतीय वायू दल, वायूसेना, एअर फोर्स, बीएसएफ, रेल्वे, आयटीबीपी, असे सात सेवा संघ येणार आहेत.
स्पर्धेची माहिती व निमंत्रण देण्यासाठी बारामती येथे आज शरद पवार यांची निमंत्रक व स्पर्धा समितीने भेट घेतली. यावेळी त्यांनी स्पर्धेबाबत मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
राज्यातील तसेच देशातील येणारे सर्व पाहुणे, खेळाडू पंच यांचे नेटके नियोजन करावे, अशा सूचना शरद पवार यांनी यावेळी केल्या. राजेश्वर प्रतिष्ठान व दीपक पवार यांनी आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेबद्दल त्यांनी स्पर्धेचे निमंत्रक दीपक व सुधीर पवार आणि स्पर्धा समितीचे अभिनंदन केले. यावेळी पैलवान चंद्रकांत सुळ, आबा सुळ, वैभव फडतरे, संदीप साळुंखे, माणिक पवार, राजेश्वर पवार, जीवन कापले, देवराज पवार, सुधीर पवार उपस्थित होते.