वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील यांना काँग्रेसच्या माजी अध्यक्ष व खासदार सोनिया गांधींचं उदाहरण देत एक सल्ला दिला. तसेच सोनिया गांधींनी जी चूक केली, ती मनोज जरांगेंनी करू नये, असंही नमूद केलं. आंबेडकरांच्या या सल्ल्यावर आता मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते रविवारी (२६ नोव्हेंबर) टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया देताना बोलत होते.

मनोज जरांगे म्हणाले, “प्रकाश आंबेडकर जे बोलत आहेत ते बरोबर आहे. मी त्यांना विचारवंत म्हणून खूप मानतो. त्यांचा घटनेचा आणि कायद्याचा फार अभ्यास आहे. मी बोलायचं म्हणून बोलत नाही. त्यांच्याविषयी आमच्या मनात पहिल्यापासून चांगल्या भावना आहे. त्यामुळे त्यांचा सल्ला आपल्याला मान्य आहे. परंतू, मला कुणीही सल्लागार नाही.”

“मी कधीही जातीवाद करत नाही आणि…”

“माझा पाठीमागे बोलण्याचा अर्थ वेगळा होता. ते बोलणं एका समुहाबाबत असल्याचं सांगण्यात आलं. त्यांनी असा गैरसमज करायला नको होता. माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा होता. मी कधीही जातीवाद करत नाही आणि कधीही जातीवर बोललेलो नाही. माझा आधीपासून तसाच स्वभाव आहे. माझ्या परिसरातील सगळ्या जातीधर्माचे लोक माझ्याबरोबर आहेत. कारण मी सगळ्या जातीधर्माच्या लोकांच्या अडीअडचणींना उभा राहतो,” असं मत मनोज जरांगेंनी व्यक्त केलं.

“मी कुणाचा सल्ला ऐकत नाही, पण प्रकाश आंबेडकरांचा सल्ला मान्य”

मनोज जरांगे पुढे म्हणाले, “मला आजपासून १०० टक्के प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला मान्य आहे. ते चांगले सल्ले देतात. एकदा पाठबळ दिलं, तर ते मागे सरकत नाहीत. त्यांनी एकदा शब्द दिला की, ते शब्द फिरवतही नाही. त्यामुळे त्यांचा सल्ला मला १०० टक्के मान्य आहे. मी कुणाचा सल्ला ऐकत नाही, पण प्रकाश आंबेडकरांचा सल्ला मान्य आहे.”

हेही वाचा : “सोनिया गांधींनी चूक केली, मनोज जरांगेंनी ती चूक…”; सल्ला देत प्रकाश आंबेडकर स्पष्टच म्हणाले…

“माझा बोलण्याचा अर्थ वेगळा होता”

“माझा बोलण्याचा अर्थ वेगळा होता. मात्र, ते वक्तव्य एका समाजाबाबत असल्याचं सांगण्यात आलं. ते तसं कुणी सांगितलं हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी ते तसं करायला नको होतं. काही लोकांना ते वक्तव्य स्वतःच्या अंगावर ओढण्याची आवश्यकता नव्हती,” असं मनोज जरांगेंनी नमूद केलं.