सांगली : कंगना राणावत, गडकरी, राहूल गांधी आदींनी लोकसभा निवडणुकीत किती मते पडतील हे ज्योतिषांनी अचूक सांगावे आणि २१ लाखाचे बक्षिस जिंकावे असे जाहीर आव्हान महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीने दिले आहे.

महाराष्ट्रात आणि देशात होणाऱ्या विविध स्तरांवरील निवडणूक निकालांचे भाकीत प्रत्येक निवडणुकीवेळी ज्योतिषी वर्तवत असतात. अनेक राजकीय नेते देखील ह्या फसवणुकीला बळी पडतात, त्यामुळे अज्ञानी आणि भाबडया लोकांच्यात गैरसमज पसरतात आणि अंधश्रध्दा निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने देशातील सर्वच ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून एकवीस लाख रुपये बक्षीस जिंकण्याचे आव्हान दिले आहे अशी माहिती डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, सम्राट हटकर, रामभाऊ डोंगरे, मिलिंद देशमुख, प्रकाश घादगिने, विनोद वायगणकर, प्रवीण देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या द्वारे दिली आहे. त्यासाठीची आव्हान प्रक्रिया व प्रश्नावली देखील महाराष्ट्र अंनिसने जाहीर केली आहे. हे आव्हान राजकीय अंदाज वर्तवणाऱ्या राजकीय अभ्यासकांना नाही तर ज्योतिष्यशास्त्राचा आधार घेऊन राजकीय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांना आहे.

हेही वाचा >>> सांगली: मविआतील बंडखोरीनंतर गुरुवारी काँग्रेसची बैठक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जे ज्योतिषी या आव्हान प्रक्रियेत सहभागी होतील, त्यांना समितीमार्फत एक प्रश्नावली दिली जाईल. या प्रश्नावलीमध्ये अंनिसने ज्योतिषांना काही प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये टी.शैलजा, नितीन गडकरी, राहुल गांधी, महुआ मलहोत्रा, कंगना राणावत यांना किती मते पडतील ? तसेच कलकत्ता उत्तर, नालंदा, रायपूर, बारामती, आग्रा, बेल्लारी या मतदार संघातून कोण विजयी होईल ? वाराणसी, बुलढाणा, चांदणी चौक, लडाख, वेल्लोर, भुवनेश्वर या मतदारसंघात सगळ्यात कमी मते कोणाला पडतील ? संपूर्ण भारतात सर्वांत कमी मते कोणत्या उमेदवाराला पडतील ? कोणत्या मतदारसंघात नोटाला जास्त मतदान होईल ? पाच हजारांपेक्षा कमी मताधिक्य किती उमेदवारांना मिळेल ?  या प्रश्नांची अचूक उत्तरे ज्योतिषांनी देणे अपेक्षित आहे.