गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांच्यातील बैठक अखेर पार पडली आहे. मराठा आरक्षणावरुन संभाजीराजे आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. संभाजीराजे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला असून यावेळी त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. दरम्यान संभाजीराजे उदयनराजेंची भेट घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. त्यामुळे ही भेट नेमकी कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. यानंतर आज पुण्यात ही भेट झाली आहे.

पुणे ते मुंबई ‘लाँग मार्च’ काढणार – संभाजीराजे

मराठा आरक्षण प्रश्नी १६ जून रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज समाधिस्थळापासून मूक आंदोलनाला सुरुवात होणार आहे. तर पुढे पुणे ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येणार आहे, अशी घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. त्यांचा या आंदोलनाला उदयनराजे समर्थन देतात का? हे पहावं लागणार आहे.

Maratha Reservation: “संभाजीराजे माझे बंधू आहेत, त्यांनी कधीही यावं”; उदयनराजेंचं मोठं विधान

उदयनराजेंनी काय म्हटलं होतं –

“माझ्या अगोदरच काही भेटीगाठी काही ठरल्या होत्या. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ अधिकाऱ्यांसोबत रस्त्याबाबतच्या दुरुस्तीसाठी आज महत्वाची बैठक आहे. माझ्या पूर्वनियोजित भेटी असल्याने आज आमची भेट होऊ शकणार नाही,” असं उदयनराजेंनी स्पष्ट केलं होतं.

“ते माझे बंधू आहेत. तुमचं घर आहे तुम्हीही कधीही येऊ शकता असं मी त्यांना सांगितलं आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यात मी त्यांच्यासमवेत आहे. आम्ही भेटणार आहे. फक्त दोन तीन दिवसांतील पूर्वनियोजित भेटीगाठी संपल्या की आम्ही भेटू. त्यावेळी चर्चेतून चांगलं काहीतरी घडेल,” असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केला होता.