छत्रपती संभाजीनगर / बीड : कोकणातील गणेशाेत्सवासाठी मराठवाड्यातील सात विभाग स्तरावरून तब्बल १ हजार २५० बस रवाना झाल्या आहेत. परिणामी अनेक मार्गांवरील फेऱ्या रद्द झाल्या असून, गौरी-गणपती या सणासुदीच्या काळात मराठवाड्यातील प्रवाशांची गैरसोय सुरू आहे. जेमतेम अर्ध्या बसवरच प्रवास करावा लागणार असून, वाहतूक व्यवस्थेवरही ताण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यातून प्रत्येकी २८५ बस रवाना झाल्याची माहिती संबंधित विभाग नियंत्रक कार्यालयाकडून मिळाली. बीड जिल्ह्यात असलेल्या ५१० बस पैकी २८५ बसेस पाठवण्यात आल्या आहेत. परभणी हिंगोली दोन जिल्ह्यांत मिळून असलेला एक विभाग व अन्य चार विभागांत मिळून ६८० बस रवाना झाल्या आहेत.

कोकणात असलेल्या गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात कोकणवासी आपल्या गावाकडे जात असतात. एकीकडे कोकणातील प्रवाशांसाठी बीड मधील २८५ बसेस पाठवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे मात्र तब्बल अर्ध्याहून अधिक बस कमी झाल्याने बीड जिल्ह्यातील प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होताना दिसून येत आहे. ऐन सणासुदीच्या काळातच बस नसल्याने प्रवाशांना बसस्थानकात तासंतास प्रतीक्षा करावी लागत आहे. यावरून संतापही व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील एक स्थानिक कार्यकर्ते डाॅ. गणेश ढवळे यांनी प्रवाशांची होत असलेल्या गैरसोयीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. जर कोकणवासियांसाठी जादा बसेस उपलब्ध करून द्यायच्या होत्या तर अतिरिक्त बसची सोय करायला हवी होती, स्थानिक प्रवाशांना ताटकळत बसावे लागत असून, एखाद्या भागातील सोय करण्यासाठी इतरांची गैरसोय करणे खेदजनक आहे, असे डाॅ. ढवळे म्हणाले.

बीड विभागातील २८५ बस कोकणात पाठवल्या आहेत. यापैकी ७० बस या कोकणात चालक वाहकासह मुक्कामी असणार आहेत. तर २१५ उर्वरित बस या ३० तारखेपर्यंत परत येणार आहेत. – अनुजा दुसाने, विभाग नियंत्रक, बीड.

छत्रपती संभाजीनगर विभागातील २८५ बस कोकणासाठी दोन दिवसांपूर्वीच पाठवण्यात आल्या आहेत. – सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक.