सांगली: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या प्रतिमेवर रविवारी सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक करीत वक्तव्याचे समर्थन केले. महात्मा गांधी यांच्याबाबत श्री.भिडे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राजकीय पक्ष व विविध संघटना यांच्याकडून जोरदार टीका होत आहे. भिडे यांच्या विरोधात काही ठिकाणी आंदोलनेही केली जात आहेत. भिडे यांच्या वक्तव्याबाबत विधीमंडळातही काही सदस्यांनी आक्षेप घेत कारवाईची आग्रही मागणी केली आहे. आक्षेपार्ह वक्तव्याबाबत अमरावती पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये रविवारी सकाळी शिवप्रतिष्ठानचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवप्रतिष्ठानचे शेकडो कार्यकर्ते जमले होते. अमरावती येथे महात्मा गांधी यांच्याबाबत गुरूजींनी आक्षेपार्ह वक्तव्य केले असल्याचा आरोप करण्यात येत असला तरी आरोप करणार्यांनी मूळ चित्रफित पाहून खात्री करावी. काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक भिडे यांच्याविरूध्द चिखलफेक करण्यात येत आहे. अमरावती येथे गुन्हा दाखल झाला असला तरी आम्ही कायदेशीर लढाई तर लढूच पण, जाणीवपूर्वक गुरूजींचा होत असलेला अवमान आम्ही सहन करणार नाही असा इशारा यावेळी हणमंतराव पवार यांनी दिला. अविनाश सावंत यांनीही यावेळी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते कायमपणे भिडे गुरूजींच्या पाठीशी खंबीरपणे असल्याची ग्वाही दिली.
आणखी वाचा-संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला विरोध; वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांची…
यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. तर प्रेरणामंत्र म्हटल्यानंतर भिडे यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी मिलिंद तानवडे, राहूल बोळाज, अंकूश जाधव, बापू हरिदास, सिध्दार्थ पेंडूरकर यांच्यासह रागिणी वेलणकर, एम. आर. कुलकर्णी, शकुंतला जाधव आदी महिलांसह शिवप्रतिष्ठानचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
पुरोगामींचे सोमवारी धरणे आंदोलन
दरम्यान, भिडे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेस व पुरोगामी संघटनांच्यावतीने सोमवारी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या वेळी भिडे यांच्या विरोधात निदर्शनेही करण्यात येणार असल्याचे काँग्र्रेसचे सरचिटणीस आशिष कोरी यांनी सांगितले.