सांगली : मीठाची भेसळ आढळल्याने १० लाखाचे ३० हजार लिटर दूध नागज (ता. कवठेमहांकाळ) येथे नष्ट करण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने ही कारवाई केल्याचे सहायक आयुक्त नि.सु. मसारे यांनी दिली.

श्री. मसारे यांनी सांगितले, अन्न सुरक्षा अधिकारी पवार, स्वामी, नमुना सहायक कवाळे, कसबेकर यांच्या पथकाने नागज फाटा येथे थांबून दूध वाहतूक करणार्‍या वाहनांची तपासणी केली. दूधाच्या पाच टँकरची तपासणी करण्यात आली. या टँकरमधील दुधाची इन्स्टंट स्ट्रीपच्या सहाय्याने भेसळीची प्राथमिक तपासणी करण्यात आली. 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) व वारणा डेअरी, कोल्हापूर येथे जाणार्‍या टँकरमधील दुधाचे ३ नमुने विश्लेषणाकरीता घेण्यात आले. यापैकी एका टँकरमधील (एम एच ०९ जी आर ५५६७) गाय दुधाची प्राथमिक तपासणी केली असता त्यामध्ये मीठाची भेसळ आढळल्याने अन्न सुरक्षा अधिकारी श्री. पवार यांनी या टँकरमधून दोन कप्प्यामधून गाय दुधाचे दोन नमुने विश्लेषणाकरीता घेऊन गाय दुधाचा १० लाख ६३ हजार ८६० रूपये किंमतीचा ३० हजार ३९६ लिटर साठा भेसळीच्या संशयावरुन ओतून नष्ट केला. 

टँकर घेरडी (ता. सांगोला) येथील एल. के. पी. दुध शितकरन केंद्र येथून गाय दुध घेवून हामीदवाडा (ता. कागल) येथील दत्त इंडीया या कंपनीस जात असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अन्न नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही घेण्यात येणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

नागरीकांना अन्न पदार्थामधील भेसळीबाबत काही माहिती असल्यास तसेच अन्न पदार्थांबाबत काही तक्रारी असल्यास अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क करुन किंवा ई मेलवर माहिती किंवा तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्री. मसारे यांनी केले आहे.