कोल्हापूर : मी एकटा पडलेलो आहे असे म्हटले की घोटाळा होतो, अशी खोचक टिपणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
कोल्हापूरच्या राजकारणात सध्या काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या वक्तव्याची चर्चा आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी नुकतेच ‘मी जिल्ह्याच्या राजकारणात एकटा पडलो आहे.’ अशा आशयाचे वक्तव्य केले. या विधानाची सध्या राज्यभर चर्चा सुरू झाली असून त्यावर विविध प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. यातूनच मुश्रीफ यांनी वरील मत व्यक्त केले.
हे सर्व साधारण निवडणुकीमध्ये बोलणे ठीक आहे. असे बोलून त्यांना सहानुभूती मिळू शकेल. मात्र गोकुळ, विधान परिषदेच्या निवडणुकीत एकटा पडलोय म्हटले की घोटाळा होतो. बहुतेक याचा पराभव होत आहे असे म्हणून लोक त्या नेत्याकडे जात नाहीत. गोकुळचे मतदार ठराविक आहेत. ते फार हुशार आहेत. सतेज पाटील यांच्या कडून असे बोलण्याची अपेक्षा नाही. त्यांनी लढाई केली पाहिजे आणि मी विजयी होणार असे सांगितलं पाहिजे, असा सल्ला मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना सल्ला दिला.