लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेण्याचे तसेच इतर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे बार्शीत गेल्या दहा दिवसांपासून भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी चालविलेले बेमुदत ठिय्या आंदोलन त्यांनी स्थगित केले आहे.

मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर महायुतीच्या विरोधात आणि महाविकास आघाडीच्या बाजूने राजकारण करीत असल्याचा आरोप आमदार राऊत यांनी केला होता. या आरोपानंतर आमदार राऊत यांनी बार्शीत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. जरांगे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत यासह मराठा आरक्षण प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावणे आणि त्यातून केंद्र सरकारला मराठा ओबीसी आरक्षण देण्याबाबत शिफारस करणे तसेच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रकारे कायदेशीर बाजू मांडणे आवश्यक असल्याचे आमदार राऊत यांचे म्हणणे होते. विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करणारा आपण एकमेव आमदार असल्याचा दावाही त्यांनी केला होता.

आणखी वाचा-महास्वच्छता अभियानाअंतर्गत सांगलीत सात टन कचरा संकलित

दरम्यान, आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बार्शीत येऊन आमदार राऊत यांची भेट घेतली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नव्हता. विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीवर आमदार राऊत हे ठाम होते. त्यांनी या प्रश्नावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि अजित पवार यांच्याशी संपर्क साधला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर अखेर आमदार राऊत यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेण्याचे तसेच इतर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यामुळे आपण ठिय्या आंदोलन तूर्त स्थगित करीत असल्याचे जाहीर केले. पुढील आंदोलन सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निश्चित केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.