शिवसेनेचा दसरा मेळावा हा दरवर्षीच चर्चेचा विषय ठरतो. त्यात गेल्या वर्षीपासून मुख्यमंत्री शिवसेनेचाच असल्याने या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असतं. यावर्षीही राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणामुळे राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं. भाजपा नेत्यांनी तर भाषणातल्या प्रत्येक मुद्द्यावर हल्ला चढवत टीका केली. आता मनसेनेही या टीकासत्रात उडी घेतली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या भाषणावरुन उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
संदीप देशपांडे यांनी ट्विट करत या मेळाव्यातल्या उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे. आपल्या ट्विट संदेशात देशपांडे म्हणाले, “दसरा मेळाव्याच्या दिवशी हिंदुहृदयसम्राटांचं भाषण म्हणजे असायची पर्वणी, आता मात्र सगळंच आळणी, गरम पाण्याच्या नावाखाली नुसतंच कोमट पाणी”.
दरम्यान, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरेंच्या भाषणावर टीका करण्याची संधी सोडली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे. मुख्यमंत्रिपदाची त्यांची महत्त्वकांक्षा होती, ती त्यांनी पूर्ण केली. आता त्याला तत्वज्ञानाची जोड देत आहेत. ते त्यांनी थांबवावं. शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं. मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं? राणेंना तर पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं. राज ठाकरेंना पक्षातून का जावं लागलं? त्यामुळे दोष देणं थांबवा. आता दोन वर्ष झाले आहेत. किती दिवस तेच तेच बोलणार. राजकारणात महत्त्वकांक्षा असणं गैर नाही. पण त्याला तत्वज्ञानाची जोड देणं कितपत योग्य आहे?”