शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट असा कलगीतुरा सुरू असताना एकनाथ शिंदेंसोबत असलेले किंवा त्यांना पाठिंबा दिलेले आमदारही शिवसेनेवर सातत्याने टीका करत आहेत. यामध्ये अमरावतीमधील राणा दाम्पत्य आघाडीवर आहे. ठाकरे सरकारच्या काळातही राणा दाम्पत्यानं हनुमान चालीसाच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे. नवनीत राणा यांनी टीव्ही ९ शी बोलताना उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका वक्तव्याचाही संदर्भ दिला आहे.

“हे प्रयत्न आधी केले असते तर..”

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला किती गर्दी जमणार, यावरून चर्चा आणि राजकीय दावे-प्रतिदावे सुरू असताना त्यावरून नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. “मला वाटतं की जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हाच जर एवढा संघर्ष आणि प्रयत्न केले असते तर महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकद त्यांना मिळाली असती. पण आज जेव्हा सगळं विस्कटलं आहे, तेव्हा हे सगळं सुरू आहे”, असं नवनीत राणा म्हणाल्या.

“उद्धव ठाकरेंच्या सभेत जबरदस्तीने आणलेले लोक”

दरम्यान, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात जबरदस्तीने आणलेले लोक असतील, असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे. “एकनाथ शिंदेंबरोबर बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत. महाराष्ट्रातले बाळासाहेब ठाकरेंना मानणारे लोक शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात उपस्थित राहतील. जबरदस्तीने ज्यांना आणलं आहे, ते उद्धव ठाकरेंच्या सभेत असतील. कारण महाराष्ट्र विचारांवर चालणारा आहे, जबरदस्तीने चालणारा नाही”, असं नवनीत राणा म्हणाल्या.

“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर!

एकनाथ शिंदेंचं कौतुक

यावेळी बोलताना नवनीत राणा यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं. “जो कायदा संविधान आम्हाला शिकवतो, त्यानुसार हा देश चालतो. त्यानुसारच सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. भविष्यात निवडणूक आयोगही शिंदे गटाच्या बाजूने निर्णय देईल. ज्या पक्षातून, चिन्हावर आम्ही निवडून आलो, त्या विचारासोबत आम्ही राहायला हवं. एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचारांचे आहेत”, असं त्या म्हणाल्या.

“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाचा संदर्भ!

उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका विधानाचा नवनीत राणांनी यावेळी संदर्भ दिला. “उद्धव ठाकरेंचं भाषण मी त्या दिवशी ऐकलं. ते म्हणाले की ‘आजपर्यंत मुलं चोरून नेल्याचं आपण ऐकलं होतं, पण बाप चोरून नेल्याचं कुणी ऐकलं नाही’. पण बाप चोरून कुणी नेत नाहीये. तुम्ही जी विचारधारा बाजूला सारली होती, ती विचारधारा आणि बापाला हातात घेऊन विचारधारा जिवंत ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी केलं. हे उद्धव ठाकरेंनी मान्य करायला हवं. ते जे बोलतायत, त्यावरून मला वाटतं की राजकीय परिपक्वता उद्धव ठाकरेंमध्ये दिसत नाहीये”, अशा शब्दांत नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.