चांदी हा सर्वोत्तम उष्माचालक धातू आहे आणि अंगी ‘उष्मा’ असेल तरच काही तरी ‘दिव्य’ घडवता येऊ शकते. म्हणून असेल कदाचित राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासकीय सेवेत येणाऱ्या भावी अधिकाऱ्यांच्या अंगी असा ‘उष्मा’ पेरण्यासाठी चांदीची ‘पारखी’ नजर असलेल्या व्यक्तीला अगदी ठरवून निवडले असावे. हे मान्य की, आयोगावर निवडली जाणारी व्यक्ती चारित्र्यसंपन्न आणि निष्कलंक कारकीर्द असलेली हवी. पण हे गुण असूनही कर्तव्यकठोर अधिकारी घडवण्यासाठी आवश्यक ‘उष्मा’ पेरण्याची क्षमता त्यांच्यात नसेल तर त्या चारित्र्यसंपन्नतेचा उपयोग काय? हाच विचार करून शासनाने ‘उष्माधारक’ चांदीप्रेमी व्यक्तीला सदस्य म्हणून निवडल्याचे दिसतेय. आयोगावरील या नवनियुक्त सदस्याचे चांदीप्रेम सर्वश्रुत आहे. नुकताच त्यांच्या मुलीचा लग्नसोहळा आटोपला. या लग्नात वऱ्हाड्यांना चांदीचे टाळ देण्यात आले आणि माइकवरून घोषणा करण्यात आली की, नवरदेव-नवरी मांडवात येतील तेव्हा ते एका सुरात वाजवायचे. उद्देश काय तर तोच… ‘उष्मा’! म्हणजे, या नवदाम्पत्याच्या आयुष्यात कधी संघर्षाचा काळ आलाच तर त्याला भिडण्यासाठी चांदीच्या टाळगर्जनेतून प्रसवलेला उष्मा कामी येईल. परंतु, उद्देश चांगला असूनही चांदीच्या टाळांवर आक्षेपांचे शिंतोडे उडालेच. नेत्यांच्या मुलांच्या लग्नात सोन्याची उधळण होत असताना कुणी आक्षेप घेत नाही. एखाद्या अधिकाऱ्याने चांदीचे टाळ काय वाटले की लगेच टीकाकारांची टोळधाड तुटून पडली. पण, म्हणून काही हे नवनियुक्त सदस्य विचलित झाले नाहीत. कसे होणार…? इतरांना चांदीचा उष्मा वाटणाऱ्या या सदस्याच्या ‘भुजां’मध्ये काही कमी बळ असणार? आता तर ते त्यांच्यातील हे अंगभूत ‘बळ’ थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पुरवणार आहेत. म्हणजे, या आयोगामार्फत निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांच्या आयुष्याचीही ‘चांदी’ होणार, हे नक्की!
– शफी पठाण