माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष यांनी आज (सोमवार) माध्यमांशी बोलताना मुंबईतील ड्रग्ज प्रकरणावरून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर टीका केली. समीर वानखेडे यांनी या ड्रग्ज प्रकरणाचा बाजार मांडलेला आहे, असं ते म्हणाले आहेत. तसेच, महाराष्ट्रामधील फिल्म इंडस्ट्री लखनऊला न्यायची, असा या मागे कुटील डाव असल्याचा देखील त्यांनी आरोप केला आहे.

अनिल गोटे म्हणाले, “ समीर वानखेडे यांनी या ड्रग्ज प्रकरणाचा बाजार मांडलेला आहे. ते जे सांगातात, की मला या ड्रग्जची चीड आहे आणि मी हे समूळ नष्ट करणार आहे. समीर वानखेडेंना माझा प्रश्न आहे, की मी त्यांना स्वत: धुळे जिल्ह्यातूल शिरपुर तालुक्यात ज्या ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत. तिथे १५०० एकर जमिनीवर गांजा लावल्याची सगळी कागदपत्रे पाठवली, लिखीत तक्रार केली. काय केलं त्यांनी? त्यांचे अधिकारी आले व येऊन गेले. पण त्यांचे अधिकारी निघून गेल्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी एक ट्रक म्हणजे १० टन गांजा पकडला होता. मग समीर वानखेडे कुठं गेले? १०० ग्रॅम गांजासाठी अख्खा देश एकत्र करतात. ८५ ग्रॅम गांजा सापडला होता त्या भारती सिंग कडे दहा दिवस तेच सुरू होतं. म्हणजे टनाने जिथे उत्पादन होतं तिथे थांबवायचं नाही, त्यांनी उत्पादन करत राहायचं आणि विकायला तिकडे गेले की यांनी पकडायचं. असं काम आहे का? समीर वानखेडेचा हा सगळा प्रकार राजकीय आहे. राजकीय द्वेषाने आहे, या बद्दल माझ्या मनात काही शंका नाही. असं नसतं तर त्यांनी शिरपुर तालुक्यात गावंगाव पिंजून काढलं असतं आणि गांजाच्या धंद्यात असलेल्या लोकांवर कारवाई केली असती.”

तसेच, “ आता जे प्रकरण सुरू आहे ते दोन कारणांनी सुरू आहे. अर्थात हे माझं व्यक्तिगत मत आहे. एक अदानीच्या पोर्टवर २१ हजार कोटींचे मादक पदार्थ सापडले. काय झालं त्याचं पुढे? कुणावर एफआयआर दाखल केला? कुणाचा जवाब घेतला? जर शाहरूख खानच्या मन्नतवर ते जात असतील, तो आर्यन तिथे राहतो म्हणून मग जिथे अदानीच्या पोर्टवर सापडले तेव्हा ते त्यांच्या घरी हे बघायला गेले का? पंतप्रधानांचे मित्र आहेत म्हणून अदानी प्रकरण लपवायचं. हा एक डाव आणि दुसरा जे फार गंभीर आहे, की महाराष्ट्रामधील जी फिल्म इंडस्ट्री आहे, ही उचलून लखनऊला न्यायची. असे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील फिल्म इंडस्ट्री बदनाम करण्याचा त्यांचा कुटील डाव आहे.” असंही गोटे यांनी बोलून दाखवलं.