सावंतवाडी / Ro- Ro Sea Service Konkan from Mumbai : सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच मुंबई ते विजयदुर्ग अशी सागरी रो-रो सेवा सुरू होणार आहे. या सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘एमटूएम प्रिन्सेस’ या प्रवासी बोटीची यशस्वी चाचणी बुधवारी सकाळी विजयदुर्ग बंदरात करण्यात आली. या चाचणीमध्ये, विजयदुर्ग बंदरात नव्याने बांधलेल्या जेट्टीवरून चारचाकी वाहने बोटीवर चढवून यशस्वी प्रात्यक्षिकही करण्यात आले. यामुळे, ही जलवाहतूक सेवा लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत.

​राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नीतेश राणे यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून हा प्रकल्प साकार होत आहे. तब्बल ३८ वर्षांनंतर ही रो-रो बोट सेवा पुन्हा सुरू होत आहे, आणि त्यामुळे हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे.

​चाचणीदरम्यान, ‘एमटूएम प्रिन्सेस’ बोटीचे कॅप्टन मृत्यूंजय सिंग यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आरिफ बगदादी, माजी सभापती संजय बोंबडी, मेरीटाईम बोर्डाचे कॅप्टन संदीप भुजबळ आणि बंदर अधिकारी उमेश महाडिक उपस्थित होते. कॅप्टन सिंग यांनी बोटीतील सोयीसुविधांची माहिती दिली. यशस्वी चाचणीनंतर ही बोट मुंबईच्या दिशेने रवाना झाली.