कंधार येथील जगतुंग तलावात बुडून पाच जणांना मृत्यू मृत्यू झाला. रविवारी दुपारी ही घटना समोर आली. मृत नांदेड येथील खुदबईनगरमधील एकाच कुटुंबातील असून सर्वजण कंधारमधील बडी दर्गाहच्या दर्शनासाठी गेले होते.

मोहम्मद शफीउद्दीन मोहम्मद गफ्फार (वय ४५), त्यांचा मुलगा मोहम्मद साद मोहम्मद शफीउद्दीन (वय १५), सय्यद सोहेल सय्यद वाहिद (२०), सय्यद नवीद सय्यद वाहिद (१५) (दोघे सख्खे भाऊ) या दोघांचा मामा मोहम्मद विखार (२३), अशी मृतांची नावे आहेत. सर्व आपल्या नातेवाईक व कुटुंबासह कंधार येथील हजरत हाजी सय्याह सरवरे मगदुम (बडी दर्गाह) च्या दर्शनासाठीरविवारी दुपारी १ वाजता गेले होते.

दर्गाहचे दर्शन झाल्यानंतर हे पाच जण व कुटुंबातील एक महिला जेवण करण्यासाठी तसेच जगतुंग तलाव पाहण्यासाठी गेले होते. तलावाकाठी जेवण करून प्लेट धुण्यासाठी पाण्याजवळ गेलेल्या एकाचा पाय घसरला. तो तलावात पडल्याचे पाहून इतरांनी त्यास वाचविण्यासाठी तलावाकडे धाव घेतली. एक-एक करुन सर्व जण तलावात उतरले. तलावात बुडत असताना सोबत असलेल्या त्यांच्या कुटूंबातील महिलेने पाहिले व त्यासंबंधातील माहिती दर्गाहमध्ये असलेल्या त्यांच्या इतर नातेवाईकांना दिली. याची माहिती कळताच स्थानिक लोकांनी तलावाकडे धाव घेत बुडत असलेल्या पाच जणांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तत्काळ त्यांना रुग्णवाहिका व ऑटोरिक्षाने ग्रामीण रुग्णालयात आणले. तपासणीअंती डॉक्टरांनी पाचही जणांना मृत घोषित केले.

मोहम्मद शफीउद्दीन मोहम्मद गफ्फार हे नांदेड येथे बेकरी व्यवसाय करत होते तर मो.साद, स.सोहेल व स.नवीद हे शिक्षण घेत होते. तसेच मो.विखार हे ऑटोचालक होते. घटनेची माहिती मिळताच खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून विशेष मदत देऊ – चिखलीकर

कंधार येथे घडलेल्या घटनेची माहिती घेतली असून तहसीलदारांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून विशेष मदत मिळवून देऊ., अशी प्रतिक्रिया खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी घटनेनंतर दिली.