नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात माजी केंद्रीय राज्यमंत्र्यांसह तीन माजी खासदार, काँग्रेसचे काही माजी आमदार तसेच अन्य स्थानिक नेत्यांची फौज आज भाजपच्या दिमतीला असतानाही, नांदेड मनपाच्या आगामी निवडणुकीत भाजपच्या प्रचाराचे नेतृत्व शिवसेनेच्या एका आमदाराकडे सोपविले जाणार असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

दोन दिवसांपूर्वी मलिक यांनी एका मराठी वृत्त वाहिनीवरील चच्रेदरम्यान शिवसेनेचे नांदेड जिल्ह्यातील तीन आमदार नजीकच्या काळात भाजपात प्रवेश करतील, अशा आशयाचे वक्तव्य केल्याचे समजल्यानंतर ‘लोकसत्ता’ ने त्यांच्याशी संपर्क साधला असता, आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार करतानाच यातील एका आमदारावर नांदेड मनपा निवडणुकीच्या प्रचारात महत्त्वाची जबाबदारी देण्यात येत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. याच आमदाराच्या घरी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आता जात आहेत. ते नांदेड मनपाच्या आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर रविवार व सोमवारी नांदेडमध्ये असून त्यांच्या उपस्थितीत पक्षनेते तसेच पदाधिकाऱ्यांची एक बठक निश्चित झाली आहे. या दौऱ्यात खासदार दानवे शिवसेनेच्या वरील आमदाराच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार असल्याचेही सांगण्यात आले.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून दीर्घकाळ सत्ता-पदे भोगलेले अनेक नेते गेल्या अडीच-तीन वर्षांत भाजपवासी झाले. त्यात शंकरराव चव्हाण यांचे जावई भास्करराव खतगावकर हे एक ठळक नाव होय; पण या सर्व नेत्यांना आतापर्यंत आपला प्रभाव सिद्ध करता आला नाही. नगरपालिका व जि. प. निवडणुकीत काही ठिकाणचे माफक यश वगळता या मंडळींना काँग्रेस खासदार अशोक चव्हाण यांनी निष्प्रभ केले.

शेजारच्या लातूर जिल्ह्यात मंत्री संभाजीराव निलंगेकर यांनी मनपाची सत्ता भाजपला मिळवून दिल्यानंतर पक्षाने नांदेड मनपासाठी प्रभारी म्हणून त्यांनाच नियुक्त केले. त्यानंतर ‘मिशन नांदेड मनपा’ यशस्वी करण्यासाठी त्यांनी पक्षाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याऐवजी शिवसेनेच्या ‘भाजपप्रेमी’ आमदारावर भिस्त ठेवली आहे. या मुद्यावर स्थानिक-जुन्या भाजप कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर असतानाच ‘राष्ट्रवादी’च्या नवाब मलिक यांनी ‘भाजपच्या प्रचाराचे नेतृत्व शिवसेना आमदाराकडे’ असे जाहीरपणे सांगितल्यामुळे येथे चाललेल्या खमंग चच्रेत ‘तडक्याची’ भर पडली.

शिवसेनेच्या या आमदाराने अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमने उधळताना त्यांच्या चांगुलपणाची तुलना विलासरावांशी केली होती. शिवसेनेचा अन्य एक आमदार तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांनी शेवटच्या टप्प्यात केलेल्या मदतीमुळे थोडय़ा मताधिक्याने विजयी झाला होता. या दोघांचीही नावे भाजपच्या यादीत आधीच विराजमान आहेत. तर नवाब मलिक यांनी त्यात अन्य दोघांपकी एकाच्या नावाची भर घालून शिवसेनेची अस्वस्थता वाढविली आहे. या संदर्भाने भाजप प्रदेशाध्यक्ष रविवारी येथे काय सांगतात, याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या ज्या आमदाराचे नाव भाजपात सर्वात आघाडीवर आहे, त्या आमदाराचा पुतण्या भाजपतर्फे मनपा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचेही समोर आले असून भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्याने या माहितीला दुजोरा दिला.

येणाऱ्यांचे स्वागतच – रातोळीकर

जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्वच आमदारांशी आमचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यातील कोण भाजपात येणार याची अधिकृत माहिती अद्याप आमच्याकडे आलेली नाही. पण त्या पक्षाचे जे आमदार भाजपात येतील, त्यांचे स्वागतच आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद देण्यात आमच्या पक्षानेच पुढाकार घेतला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nanded municipal corporation election 2017 shiv sena bjp campaign nawab malik
First published on: 30-07-2017 at 02:44 IST