नांदेड : पोलीस पथकावर पिस्तूल रोखणाऱ्या आरोपीवर स्वसंरक्षणार्थ गोळीबार करून त्यास ताब्यात घ्यावे लागले. प्रभाकर हंबर्डे असे आरोपीचे नाव आहे. त्याला झोपडपट्टी दादा प्रतिबंध कायद्यान्वये अटक करण्यात आली होती. जामिनीवर सुटल्यानंतर त्याने त्याच्या मित्राचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर पिस्तूल रोखल्याने पोलिसांना स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागला. आरोपी हंबर्डे यास रुग्णालयात पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
विष्णुपुरी व परिसरात दहशत पसरवणाऱ्या प्रभाकर हंबर्डे यास सिडको पोलिसांनी मकोका कायद्यान्वये कारागृहात स्थानबद्ध केले होते. त्यानंतर तो जामिनावर सुटला होता. गुन्हेगार प्रभाकर शंकरराव हंबर्डे याने जामिनावर बाहेर येताच आपल्या मित्राचा म्हणजे आकाश वसंता जाधव (वय २२) याचा १८ मे रोजी खंजरने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला. याच प्रकरणात ग्रामीण पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असताना ३ जून रोजी तो विष्णुपुरी परिसरात आला असल्याची माहिती मिळाली.
नांदेड ग्रामीण पोलीस आपल्या मागावर असल्याची माहिती त्याला मिळताच त्याने दुचाकीवर पांगरी शिवाराकडे पळ काढला. पोलिसांनी पाठलाग सुरू ठेवला असताना त्याने पांगरी शिवारातील कॅनॉल रोडवर दुचाकी सोडून तो जंगलात पसार झाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता प्रभाकर हंबर्डे याने शेवटी पोलिसांवर पिस्तूल रोखले. पिस्तूल रोखताच नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याच्यावर कंबरेखाली गोळी झाडली आणि तो जागीच कोसळला. हा थरार पांगरी शिवारात मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडला. हंबर्डे हा सराईत असून, त्याच्यावर विविध प्रकारच्या नऊ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्यासह सर्वच अधिकारी घटनास्थळी धावले. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपूर्ण जिल्ह्यातील गुन्हेगारांना वारंवार समज देऊनही त्यांच्या वर्तनात बदल होत नसेल, तर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंगळवारी ग्रामीण पोलिसांनी केलेले कामगिरीचे कौतुक करताना पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी संबंधित आरोपीकडून रिव्हॉल्व्हर, दुचाकी, मोबाइल जप्त केल्याची माहिती दिली.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठल्याही गुन्हेगाराची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. शांततेचा भंग केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर हंबर्डे यास पुढील कारवाईसाठी अटक केली जाईल. – ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस ठाणे, नांदेड