नांदेड : काँग्रेस पक्ष सोडून भाजपावासी झालेले खासदार अशोक चव्हाण यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठींना उद्देशून केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस आणि मित्रपक्ष-पदाधिकाऱ्यांच्या बुधवारी येथे झालेल्या बैठकीत सर्वांनीच मौन बाळगले. दुसरीकडे कंधारचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी मात्र एका मुलाखतीत चव्हाण यांच्यावर टीका केली.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त बुधवारी दिवसभरात जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे आणि भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम-उपक्रम पार पाडले जात असताना काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात दीर्घ कालावधीनंतर महाविकास आघाडीतील पक्षांच्या जिल्हा-तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अशोक चव्हाण यांच्या लातूर येथील वक्तव्यावर कोणतेही भाष्य केले नाही, असे सांगण्यात आले.
अधिक माहिती घेतली असता असे समजले की, महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे लोकशाहीस बाधक असल्यामुळे त्याविरुद्ध जनमत संघटित करण्यासाठी महाविकास आघाडीच्या राज्यस्तरीय नेत्यांनी येत्या २ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्याचा कार्यक्रम आखला आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी वरील बैठक आयोजित करण्यात आली. आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी २ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली असली, तरी त्याच दिवशी विजयादशमी (दसरा) सण असल्यामुळे या तारखेस व्यापक आंदोलन करता येणार नाही, असे मत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
जनसुरक्षा विधेयकाचा मुद्दा गंभीर आहेच; पण नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी हवालदिल झाला असून ग्रामीण जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. आपत्तीग्रस्तांना दिलासा देणारा कोणताही प्रस्ताव शासनाकडून अद्याप हाती घेतला गेलेला नाही. नियोजित आंदोलनामध्ये हा मुद्दा घेतला पाहिजे, असे मत सर्वच पक्षांच्या प्रमुखांनी बैठकीमध्ये मांडले.
आंदोलनाची नवीन तारीख निश्चित करण्यासाठी एक समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय वरील बैठकीमध्ये झाला. ही समिती चर्चा करून आंदोलनाची तारीख ठरवेल, असे सांगण्यात आले. काँग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी बैठकीला हजर होते. पण या पक्षाचे माजी नेते अशोक चव्हाण यांच्याबद्दल त्यांनी मौन बाळगल्यामुळे अन्य पक्षांच्या प्रतिनिधींनीही चव्हाणांच्या लातूरमधील वक्तव्यावर मतप्रदर्शन केले नाही, असे राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने बैठकीनंतर सांगितले.
वरील बैठकीला खासदार रवींद्र चव्हाण, माजी आमदार रोहिदास चव्हाण, हनमंतराव बेटमोगरेकर, भगवानराव आलेगावकर, डॉ. सुनील चव्हाण, प्रा.जांभरुनकर, प्रा.पुरुषोत्तम धोंडगे, प्रकाश मारावार, भुजंग पाटील, बबन बारसे, अब्दुल सत्तार, प्रा.रेखा चव्हाण यांच्यासह पाच पक्षांचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
अशोक चव्हाण हे व्यावसायिक राजकारणी आहेत. ते काय बोलले ती त्यांची व्यक्तिगत बाब आहे. व्यावसायिक राजकारणी माणसांचे वक्तव्य फार गांभीर्याने घेऊ नये. त्यांच्यामध्ये फार काही विचारधारा नाही. मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. नंतर भारत राष्ट्र समितीत गेलो; मी कधी पक्षनेतृत्वाला दोष दिला नाही. खा. अशोक चव्हाण यांनी आधीच्या पक्षाबद्दलची वक्तव्ये टाळली पाहिजेत. – शंकरअण्णा धोंडगे, माजी आमदार लोहा-कंधार