Narayan Rane on Uddhav and Raj Thackeray Alliance : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. दोन्ही पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्त्वाकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिली जात नसली तरीही एकत्र येण्याबाबत सकारात्मक असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणाच्या चर्चेवर नारायण राणे म्हणाले, “कोणाशी युती करताना आपण ताकद पाहतो की नाही? कोणाकडे किती आमदार, खासदार आहेत? आमचे भाजपाचे १३४ आमदार आहेत. अजित पवारांकडे ४१, शिंदेकडे ५२ आहेत. ही सगळी ताकद २०० च्या जवळ गेलीय. मग यांना काय फायदा होणार? मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काय फायदा होणार? बाळासाहेबांनी जे निर्माण केलंय तेच खात आहेत. जे होते ते कमी कमी होत २० वर आले. पुढच्या वेळेला पाचच निवडून येतील.”
“या दोन्ही ठाकरेंचे उत्पन्न काढा आणि म्हणा की यांनी भ्रष्टाचार केला नाही. यांनी परदेशात गुंतवणूक केली आहे. कोणत्या कंपनीचा नफा तिकडे पाठवला? करोन काळात सर्व वृत्तपत्र नुकसानीत होते, पण सामना फायद्यात होता. सीएला विचारलं पाहिजे. उद्धव यांनी भाजपा, अमित शाह, मोदी हे शब्द उच्चारू नये”, असंही ते म्हणाले.