विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे घेतलेल्या शपथविधीबाबतच्या अनेक प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत. अजित पवार यांनी कोणत्या परिस्थितीत तेव्हा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती? या शपथविधीबाबत शरद पवार यांची भूमिका काय होती? या प्रश्नांची नेमकी उत्तरं कोणालाही माहिती नाहीत. मात्र सध्या अजित पवार गटात असलेले नेते सुनिल तटकरे यांनी याच पहाटेच्या शपथविधीवर महत्त्वाची विधानं केली आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

आम्ही दोन्ही पर्याय खुले ठेवले होते

यावेळी बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, अजित पवार यांच्या कोअर कमिटीत मी नव्हतो. मात्र अजित पवार यांच्या विश्वासातला एक सहकारी म्हणून माझी वाटचाल राहिलेली आहे. भाजपा आणि शिवसेना एकत्र सरकार स्थापन करणार नाहीत, हे स्पष्ट झाल्यानंतर त्या वेळेला वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केला जाऊ लागला. यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपा यांचे थेट सरकार किंवा महाविकास आघाडीच्या पर्यायावर विचार केला जाऊ लागला. आमच्यापुढे दोन पर्याय होते. आम्ही दोन्ही पर्याय खुले ठेवले होते. ही चर्चा पक्षनेतृत्वाच्या संमतीनेच होत होती.

“…आणि सकाळची शपथ झाली”

“त्या १५ ते २० दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडत होत्या. दिल्लीमध्ये काही बैठका झाल्या. मुंबईला चव्हाण सेंटरमध्येही बैठक झाली होती. मात्र महाविकास आघाडीच्या दृष्टीने या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली नाही. त्याच्यानंतरच अनेक घडामोडी घडल्या आणि सकाळची शपथ झाली,” असे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“काळ हेच त्याला उत्तर”

“अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा सकाळचे ८ वाजले होते. पहाटेचा शपथविधी म्हणून अजित पवार यांच्यावर अन्याय होतो. सकाळच्या लख्ख प्रकाशात त्यांनी शपथ घेतली होती. या शपथेबाबतच्या अनेक प्रश्नांची उत्तरं काळाच्या ओघात मिळतील. काळ हेच त्या प्रश्नांवर उत्तर आहे,” असेदेखील सुनिल तटकरे म्हणाले.