सांगली : पाण्यापासून वंचित असलेल्या गावासाठी टेंभूच्या सुधारित योजनेला प्रशासकीय मान्यता मिळावी या मागणीसाठी मंगळवारी दुसर्या दिवशीही आमदार सुमनताई पाटील व रोहित पाटील यांचे उपोषण सुरूच असून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महिन्यात प्रशासकीय मान्यता देण्याचे मान्य करून उपोषण सोडण्याचे आवाहन केले.
हेही वाचा >>> बच्चू कडूंनी टोचले अधिकाऱ्यांचे कान; म्हणाले “अपंगांच्या योजना…”
आमदार श्रीमती पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाच्या दुसर्या दिवशी आमदार अनिल बाबर यांनी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यासह चर्चा केली. योजनेसाठी 8 टीएमसी पाणी देण्यास मान्यता दिली असून या कामाची सुधारित प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर मिळावी यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. तसेच रोहित पाटील यांच्याशी यावेळी भ्रमणध्वनीवरून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संवाद साधून प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागत असला तरी एक महिन्यात मान्यता दिली जाईल असे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र ही विनंती पाटील यांनी मान्य केली नाही. दरम्यान, आज उपोषण स्थळी काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी भेट देउन पाठिंबा दर्शवला.