अलिबाग: महाराष्ट्र हा शाहू फुले आणि आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे राज्य होते. मात्र आजच्या राज्यकर्त्यांना शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांबाबत किती आस्था आहे. याबद्दल शंका वाटते, ही परिस्थिती बदलायची असेल तर डाव्या आणि रिपब्लिकन विचारांच्या पक्षांनी एकत्र यायला हवे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. ते अलिबाग येथे पिएनपी नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.
यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार निलेश लंके, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुष्मा अंधारे आमदार बाबासाहेब देशमुख आणि शेकाप सरचिटणीस जयंत पाटील उपस्थित होते. महाराष्ट्राचे चित्र बदलायचे आहे. महाराष्ट्राचे समाजकारण योग्य सामाजिक दृष्ट्या योग्य तऱ्हेने पुर्नस्थापित करायचे असले, तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना शक्ती द्यावी लागले. त्यासाठी प्रादेशिक विचाराच्या लोकांना आपआपसातले मदभेद विसरून एकत्र यावे लागेल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, डावे पक्ष, रिपब्लिकन पक्ष यांना एकत्रित येऊन प्रयत्न करावे लागतील असेही पवार यांनी यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमात शरद पवार यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या आठवणीना उजाळा दिला. शेकाप बद्दल बोलतांना ते म्हणाले, माझी बरेचसे सार्वजनिक जीवन काँग्रेस मध्ये गेले, पण माझे घर शेकापवाले होते. माझी आई आणि भाऊ वसंतराव पवार हे सुरुवातीपासून शेकापमध्ये होते. त्यामुळे आईने तुझी विचारसणी तुझ्याकडे ठेव आम्ही आमच्या विचारांनीच पुढे जाऊ असे स्पष्ट सांगीतले होते. त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष मी घरात असल्यापासून पाहत आलो आहे.
अनेक शेकापचे अनेक नेते आमच्या घरी येत असत. भाऊसाहेब राऊत, केशवराव जेधे, शंकराव मोरे, ना ना पाटील, एन डी पाटील आमच्या घरी आलेले आहेत. हे नेते आयुश्यभर आपल्या भुमिकेशी, विचारांशी आणि तत्वांशी कायम प्रामाणिक राहीले, कष्टकऱ्यांच्या हिताशी जपणूक त्यांनी नेहमी केली. सत्ता असो अथवा नसो त्यांनी त्याची पर्वा कधी केली नाही. आज पुन्हा एकदा हा विचार पुढे नेण्याचे काम जयंत पाटील करत आहेत. त्याला कार्यकर्त्यांची साथ मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. राजकीय जीवनात काही घटना घडतात पण त्यातून नाउमेद व्हायचे नसते असा सल्ला पवार यांनी शेकापच्या कार्यकर्त्यांना दिला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, निलेश लंके, सुषमा अंधारे आणि जयंत पाटील यांनी उपस्थिताना संबोधित केले.