NCP Prashant Pawar on Laxman Hake : “लक्ष्मण हाकेंनी आठ दिवसांत अजित पवार यांची माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासू”, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी दिला आहे. “त्यांनी माफी न मागितल्यास आम्ही त्यांना निपटवून टाकू”, असंही पवार म्हणाले. तसेच “हाके हे काही ओबीसी नेते नाहीत”, असा टोलाही प्रशांत पवारांनी लगावला आहे.

प्रशांत पवार म्हणाले, “अजित पवार कुठे आणि हा लक्ष्मण हाके कुठे… तो म्हणाला, जनावराला गोचिड चिकटून राहते, तसे अजित पवार सत्तेला आणि अर्थखात्याला चिकटून आहेत. त्याला अर्थखातं काय असतं ते तरी माहिती आहे का? अजित पवारांबद्दल बोलण्यापूर्वी त्याने आधी स्वतःची उंची पाहावी. तो दारुच्या गुत्त्यावर जातो, बारमध्ये बसतो. त्याने अजित पवारांची माफी मागावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याला निपटवण्याची भाषा वापरल्याशिवाय राहणार नाही, त्याला सोडणार नाही”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लक्ष्मण हाके काय म्हणाले होते?

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले असताना त्यांच्या विरोधात व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेऊन आंदोलन केल्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेले लक्ष्मण हाके यांनी बुधवारी (४ जून) नांदेड येथे प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “अजित पवार हे गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री व अर्थमंत्रिपदावर आहेत. त्यांना प्रत्येक वेळी अर्थखातं का हवं असतं? खेड्यापाड्यांमधील भटक्या विमुक्त जातींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत अजित पवार पाच-पंचवीस कारखान्यांचे मालक झाले आहेत. ते महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा टाकत आहेत”.