जालना : भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या भोकरदनमध्ये उपविभागीय कार्यालयावर सोमवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बैलगाडी, ट्रॅक्टर घेऊन आक्रोश मोर्चा काढून संपूर्ण कर्जमाफी द्यावी यासह विविध मागण्या केल्या. या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार शशिकांत शिंदे, खासदार नीलेश लंके, आमदार रोहित पवार, मेहबूब शेख, माजी मंत्री राजेश टोपे, चंद्रकांत दानवे, जालन्याचे काँग्रेसचे खासदार डाॅ. कल्याण काळे आदींचा सहभाग होता.

भोकरदन व जाफराबाद तालुक्यात पावसाने थैमान घातले असून, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र भोकरदन व जाफराबाद तालुक्याचा अतिवृष्टी वा ओला दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये शासनस्तरावर समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुका म्हणून करण्यात यावा व शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकरी हा सतत नैसर्गिक संकटात सापडत असल्यामुळे त्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी या प्रमुख मागण्यासाठी भोकरदन पंचायत समिती कार्यालयापासून बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात झाली.

या मोर्चामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चाचे भोकरदन नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात सभेत रुपांतर झाले. यावेळी व्यासपीठावर निरीक्षक संजय वाघचौरे, जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा सुरेखाताई लहाने आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, सध्याचं सरकार मतांचं राजकारण करत असून, जाती-जातीत भांडणे लावत आहे. राज्यात सध्या ओला दुष्काळ पडला आहे. परंतु शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली केली जात आहे. शासन स्तरावरून येत्या १२ तारखेपर्यंत ठोस पावले उचलली गेली नाही तर शेतकऱ्यांसोबत राष्ट्रवादी व प्रदेक्षाध्यक्ष म्हणून मी रस्त्यावर उतरणार आहे.

राज्यात शेतकऱ्यांना गृहीत न धरणारे सरकार : पवार

सध्याचे सरकार हे भ्रष्ट असून, आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना हेक्टरी २७ हजार रुपये व ३ हेक्टर पर्यंत मदत दिलेली आहे. मात्र असे असताना आता या सरकारने हेक्टरी १६ हजार रु. २ हेक्टर पर्यंत मदत देण्याचा अध्यादेश काढून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली.

सरकार येणारी दिवाळी गोड करो अथवा ना करो, आम्ही मात्र या भागातील ऊस बागायतदार शेतकऱ्यांची दिवाळी उसाचे बोनस देऊन गोड करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.