Nitesh Rane on Dino Morea Mithi River Desilting Scam : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा (आमदार आदित्य ठाकरे) या पावसाळ्यात जेलची वारी (तुरुंगवारी) करू शकतो, असा दावा मत्स्य व बंदरे विभागाचे मंत्री तथा भाजपा नेते नितेश राणे यांनी केला आहे. मुंबईतील मिठी नदी घोटाळा प्रकरणी बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया याची चौकशी चालू आहे. त्याच्या घरी छापेमारी देखील झाली आहे. याच घटनेचा संदर्भ देत राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या अटकेचा दावा केला आहे.

नितेश राणे म्हणाले, “डिनो मोरियावर काही कारवाया चालू आहेत. मात्र, त्याच्यावरील कारवाईवरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू केली आहे. डिनो मोरिया प्रकरणामुळे उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. उद्धव ठाकरेंचा मुलगा तुरुंगात जाऊ शकतो असे खुलासे या प्रकरणातून झाले आहेत”.

मत्स्य व बंदरे विभागाचे मंत्री म्हणाले, “हा डिनो मोरिया रोज संध्याकाळी कोणाबरोबर उठायचा-बसायचा, त्याचे कोणाबरोबर भावनिक संबंध असू शकतात, याची सर्वांना माहिती आहे. या सगळ्या प्रकरणावरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी व दुसरीकडे वळवण्यासाठी राज व उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा घडवून आणली जात आहे. डिनो मोरिया प्रकरणी वेगवेगळी माहिती तपासात पुढे येत आहे”.

डिनो मोरियाच्या घरावर ईडीची छापेमारी

बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया सध्या कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात त्याचं नाव समोर आलं आहे. मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामात झालेल्या घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी (६ जून) डिनोच्या घरावर छापा टाकला. याप्रकरणी तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थी व दोन कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईत पूर प्रतिबंधक गाळ पुशर आणि ड्रेनेजच्या कामांसाठी वाटप केलेल्या ड्रेजिंग मशीनच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी ईडीचे अधिकारी आर्थिक कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक डेटा व व्यवहारांच्या नोंदी तपासत आहेत. याप्रकरणी ईडीने शुक्रवारी मुंबई व कोचीमधील एकूण १५ ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये मोरिया, बीएमसीचे सहाय्यक अभियंता प्रशांत रामुगडे आणि काही कंत्राटदारांच्या मालमत्तांचा समावेश आहे.