सांगली : महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश करण्याबाबत काढण्यात आलेला अध्यादेश ओबीसी प्रवर्गावर अन्याय करणारा असून या अन्यायाविरोधात वाळवा तालुका ओबीसी समाजाच्यावतीने बुधवार दि. २४ सप्टेंबर रोजी ओबीसी समाज आरक्षण हक्क मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती मोर्चाचे निमंत्रक चिमण डांगे यांनी गुरूवारी पत्रकार बैठकीत दिली.

ओबीसीमध्ये सहभागी असलेल्या विविध जातींच्या प्रतिनिधींची बैठक होउन या बैठकीत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा विरोध मराठा समाजाविरूध्द नसून अन्यायकारक जीआर विरोधात असल्याचे श्री. डांगे यांनी सांगितले. मराठा समाजाला जर कुणबी प्रमाणपत्र मिळाले तर त्यांचा ओबीसीमध्ये समावेश होतो. यामुळे ओबीसीमधील विविध जातीवर अन्याय होणार आहे.

घटनेने ओबीसी समाजाला दिलेल्या २७ टक्के आरक्षणात मराठा समाजाचाही समावेश केल्याने मुळात असलेल्या ओबीसी समाजावर शैक्षणिक, राजकीय, नोकरी मध्ये अन्याय होणार आहे, या अध्यादेशामुळे सर्व ओबीसी समाज अस्वस्थ असल्याने वाळवा तालुक्यातील ५४ जातींचा समावेश असणार्‍या ओबीसी समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे असे श्री. डांगे यांनी सांगितले.

ओबीसीसाठी असणारे २७ टक्के आरक्षण वगळून मराठा समाजाला कितीही टक्के आरक्षण दिले तरी चालेल, त्याला आमचा विरोध असणार नसल्याचे ते म्हणाले, हा मोर्चा कोणा जातीच्या विरोधात नसून आमच्या हक्का साठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बुधवार दि.२४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता इस्लामपूर येथील वाळवा पंचायत समिती पासून हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात येणार आहे, या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे पाच मुली पारंपरिक वेशभूषेत मोर्चाचे नेतृत्व करतील, याच मुली मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देतील व याच मुली मोर्चाला संबोधित करतील. मोर्चा शिस्तबद्ध कोणाच्याही विरोधात घोषणा किंवा टीका टिपणी नकरता काढला जाईल असेही श्री. डांगे यांनी स्पष्ट केले.

हैदराबाद, सातारा व औंध संस्थानच्या गॅझेटियरमध्ये असलेल्या नोंदीवरून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या निर्णयामुळे ओबीसीमध्ये समाविष्ट असलेल्या विविध जातीच्या आरक्षणावर परिणाम होणार आहे. यासाठी या अद्यादेशाला विरोध करण्याचा आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसींचा विरोध आहे. म्हणून शासनाने काढलेला अद्यादेशालाच विरोध करण्याचा निर्णय ओबीसीतील सर्व जातीनी घेतला असून मोर्चा काढण्यात येणार असल्याचे श्री.डांगे यांनी सांगितले.