मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोमवारी राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून तब्बल ३१७ ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत या दवाखान्यांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याचा विचार करून प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती. आता वाढत्या शहरीकरणाचा व विस्तारित शहरांचा विचार करता गोरगरीब रुग्णांना सामान्य आजारांसाठी तात्काळ आरोग्य तपासणी व उपचाराची सुविधा मिळणे ही मोठी गरज निर्माण झाली आहे. या दृष्टीकोनातून आरोग्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही संकल्पना मांडली होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने पहिल्या टप्प्यात दोनशे दवाखान्यांना मान्यता दिली होती. करोनाकाळामुळे यातील फारच थोडे दवाखाने तेव्हा प्रत्यक्षात सुरू होऊ शकले. मात्र मुख्यमंत्री बनल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेला युद्धपातळीवर गती देण्याचा निर्णय घेतला.

यातूनच पहिल्या टप्प्यात १७ नोव्हेंबर रोजी मुंबई महापालिकेने ५१ ‘आपला दवाखाने’ मुंबईत सुरु केले. त्यानंतर गेल्या सहा महिन्यात मुंबई महापालिकेने तब्बल १५१ ‘आपला दवाखाना’ सुरु केले असून आजपर्यंत सात लाखाहून अधिक रुग्णांची या दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले.

दरम्यान आरोग्य विभागानेही राज्यात तालुकानिहाय आपला दवाखाना सुरु करण्यासाठी कंबर कसली. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्यात पहिल्या टप्प्यात ५०० ‘आपला दवाखाना’ उभारण्याचा आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला. या योजनेला अलीकडेच मान्यता मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने राज्यात परिमंडळ निहाय दवाखान्याची जागा शोधण्यापासून डॉक्टरांच्या नियुक्तीपर्यंतची सर्व तयारी सुरु केली. आरोग्य विभागाच्या सूत्रांनुसार आतापर्यंत ३१७ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्यासाठी सविस्तर तयारी झाली असून उद्या १ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या दवाखान्यांचे लोकार्पण होणार आहे.

यात ठाणे परिमंडळात २९ आपला दवाखाना असून पुणे परिमंडळ ३०, नाशिक परिमंडळ ५२, कोल्हापूर २७, छत्रपती संभाजीनगर परिमंडळ २८,लातूर परिमंडळ ४४,अकोला परिमंडळ ५३ आणि नागपूर परिमंडळात ५४ असे ३१७ आपला दवाखाना सुरु करण्यात येणार आहे.

रात्री दहापर्यंत या दवाखान्यांमध्ये रुग्ण तपासणी करण्यात येईल तसेच त्यांना मोफत औषधोपचार केला जाणार आहेत. तसेच गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी, लसीकरण, महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, मानसिक आरोग्य विषयक समुपदेशन तसेच आवश्यकतेनुसार विशेषज्ञांच्या संदर्भ सेवा सल्ला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचबरोबर या केंद्रात टेलिकन्सल्टन्सी सुरु करण्याचाही आरोग्य विभागाचा मानस आहे. मुंबईतील बहुतेक आपला दवाखाना हे झोपडपट्टी केंद्रीत असून राज्यात सोमवारपासून सुरु होणारे दवाखाने हे तालुका केंद्रित असतील असे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the eve of maharashtra day 317 balasaheb thackeray apla dawakhana will started cm eknath shinde rmm
First published on: 30-04-2023 at 20:28 IST