ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पहिल्यांदाच सुरू केलेल्या ऑनलाईन उमेदवारी अर्ज स्वीकृतीबाबत संगणक प्रणालीपासून अनभिज्ञ व सुविधा नसल्याने पुरता बोजवारा उडाला! १२० ग्रामपंचायतींच्या जवळपास ७००पेक्षा जास्त जागांसाठी ५ दिवसांत एकही ऑनलाईन अर्ज आला नाही. शेवटचे २ दिवस शिल्लक असताना केवळ ८०० अर्ज आले. यानंतर खडबडून जागे होत प्रशासनाने निवडणूक आयोगाला याची माहिती दिली. परिणामी शुक्रवारी शेवटच्या दिवशी पारंपरिकपद्धतीने अर्ज स्वीकारण्याचे आणि ऑनलाईन पद्धतीत राहिलेली माहिती छापील प्रत जमा करताना उमेदवारांकडून भरून घ्यावी, असे आदेश बजावले.
जिल्ह्यात ९२ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षकि, तर २४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होत असून, जवळपास ७०० पेक्षा जास्त जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास ४ जुलस सुरुवात झाली. राज्य निवडणूक आयोगाने प्रथमच उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरून छापील प्रत जमा करण्याची नवी प्रक्रिया सुरू केली. मात्र, स्थानिक पातळीवर इच्छुक उमेदवार व प्रशासकीय यंत्रणेला ऑनलाईन अर्ज भरण्याची पुरेशी माहिती नसल्यामुळे अर्ज भरायचा कसा, असा प्रश्न पडून सर्वत्र गोंधळ उडाला.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर गावागावात राजकीय वातावरण तापून इच्छुकांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, ऑनलाईन पद्धतीने अनेकांच्या आशेवर पाणी फेरले. ग्रामीण भागातील अल्पशिक्षित, अजूनही अंगठेबहाद्दर, संगणक प्रणालीपासून अनभिज्ञ इच्छुकांना ऑनलाईन अर्ज कुठे, कसा भरायचा, याचाच मेळ लागेना. तालुक्याच्या ठिकाणीही सायबर कॅफेवर अर्ज भरण्यास प्रयत्न सुरू झाले, तरी कॅफेवाल्यांनाही फारसे माहीत नसल्यामुळे अर्ज भरण्यास सुरुवात होऊन ५ दिवस लोटले तरी एकही अर्ज दाखल झाला नाही. इच्छुकांनी तालुक्याच्या ठिकाणी येऊन तहसीलसमोरील संगणकप्रणाली असलेल्या दुकानांमध्ये गर्दी केली होती. मात्र, कधी सव्र्हर साथ देत नसल्याने, तर कधी माणूस नसल्याने अर्ज भरण्यास अडचणी निर्माण होत गेल्या.
प्रशासकीय यंत्रणेने गावपातळीवर लोकांना प्रोत्साहित केल्यानंतर शेवटच्या दिवसाआधी गुरुवारी ११ तालुक्यातून ७९९ अर्ज ऑनलाईन दाखल झाले. प्रशासकीय यंत्रणेने शुक्रवारी सकाळी ११ वाजता राज्य निवडणूक आयोगाबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ऑनलाईन अर्जाचा तपशील दिला. अखेर आयोगाने शेवटच्या दिवशी सायंकाळी साडेपाचपर्यंत ऑनलाईनबरोबर पारंपरिक पद्धतीनेही उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे आदेश बजावले. ऑनलाईन अर्जात राहिलेली माहिती छापील अर्ज स्वीकारताना उमेदवारांकडून भरून घेण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यास दुपारनंतर सर्वत्रच इच्छुकांची गर्दी वाढली.