पंढरपूर : सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी आता तासन् तास रांगेत उभे राहण्याची गरज लागणार नाही. प्रायोगिक तत्त्वावर टोकन दर्शन प्रणाली चाचणीचा शुभारंभ करण्यात आला आहे. सुरुवातीला २६ जूनपर्यंत ही सुविधा उपलब्ध असणार आहे. यामधील काही त्रुटी आणि बदल करून पुढे ही सुविधा सुरू करणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. समितीच्या संकेतस्थळावरून ही सुविधा सुरू असून भाविकांसाठी ऑफलाइन म्हणजेच दर्शनरांगेच्या माध्यमातून देखील दर्शन घेता येणार आहे.

विठुरायाच्या दर्शनाची आस प्रत्येक भाविकाला असते. तासन् तास दर्शन रांगेत उभे राहून दर्शन घेतले जाते. मात्र तिरुपती बालाजीच्या धर्तीवर आता पंढरीच्या विठुरायाचे दर्शन हे देखील आता सहज आणि तत्काळ होणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावरून बुकिंग करता येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ज्या तारखेला, किती वाजता दर्शन घ्यायचे आहे त्याची वेळ निश्चित करून आणि आवश्यक ती माहिती भरून तुम्हाला त्याची प्रिंट काढायची आहे. येथील नामदेव पायरीजवळील श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथून या टोकनची पडताळणी करून घेणे व नंतर दर्शन हॉलमध्ये प्रवेश दिला जाईल व वेळेनुसार थेट दर्शन रांगेत प्रवेश होऊन दर्शन होणार आहे. रोज १ हजार २०० भाविकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ या कालावधीत देवाचे उपचार, आरती वगळून प्रत्येक तासाला २०० भाविकांना दर्शन घेता येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या टोकन दर्शन प्रणालीचा शुभारंभ समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते व समितीचे सदस्यांच्या उपस्थितीत झाला. मंदिर समिती वारकरी भाविकांना केंद्रबिंदू मानून आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहे. या चाचणीमध्ये काही त्रुटी व नव्याने काही सुविधा निर्माण करण्याची गरज भासल्यास, त्याची पूर्तता करण्यात येईल. याशिवाय, मूळ दर्शनरांगेतील भाविकांना दर्शनासाठी विलंब होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आली आहे. तसेच ही सुविधा मोफत असून समिती कोणतीही शुल्क आकारत नाही, असे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. एकंदरीत विठ्ठलाचे दर्शन आता सुलभ होईल.