पंढरपूर : कार्तिकी यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांबाबत स्थानिक प्रशासनाच्या नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. वास्तविक अवघ्या पंधरा दिवसांवर वारी आली असताना कामाची सुरुवात झालेली नाही. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत बैठक घेऊन २७ ऑक्टोबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहे.
कार्तिकी एकादशी २ नोव्हेंबर रोजी आहे. त्यामुळे ऐन वारीच्या तोंडावर कामे पूर्ण होणार का, त्या कामाचा दर्जा चांगला राहणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
कार्तिकी वारीला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या वारीसाठी जवळपास ५ ते ६ लाख भाविक येतात. या वारीच्या नियोजनाबाबत येथील प्रांताधिकारी यांनी बैठक घेऊन प्रशासनाला कामाला लावले.
त्यानंतर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी या नियोजनाची बैठक घेतली. बैठकीत पालिका, पोलीस, मंदिर समिती, आरोग्य विभाग, वीजवितरण कंपनी, अन्न व भेसळ प्रशासन आदी कार्यालयीन प्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना नियोजित कामाची माहिती बैठकीत दिली. यात काही बदल सुचवत सर्व कामे २७ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश सर्व विभागप्रमुखांना दिला. वास्तविक, अनेक कामे अद्याप सुरू नाहीत. यामध्ये शहरातील अतिक्रमणे, चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेतील स्वच्छता, सर्व घाटांवर लाइट व्यवस्था अशी अनेक कामे अद्याप सुरू झालेली नाहीत.
कार्तिकी वारी दिवाळीनंतर लगेच असते. या वारीसाठी भाविक वारीच्या आधीच दिवाळी सुटीत पंढरीत येतात. त्यामुळे एकीकडे भाविक येण्याची, तर दुसरीकडे प्रशासनाची कामे पूर्ण करण्याची घाई राहणार आहे. त्यामुळे कामाचा दर्जा चांगला राहणार का, सर्व कामे पूर्ण होणार का, असा सवाल स्थानिक भारत वरपे यांनी केला आहे. दरम्यान, कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा २ नोव्हेबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. असे असले, तरी याही वारीच्या तोंडावर प्रशासनाची कामे उरकण्याची लगबग दिसून येणार अशी चिन्हे आहेत.
रस्ते कमी खड्डे जास्त
आषाढी यात्रेला म्हणजे चार महिन्यांपूर्वी शहरातील रस्ते एकदम चकाचक करण्यात आले. लाखो रुपये खर्चून चांगले रस्ते केले. मात्र, आता अनेक ठिकाणी खड्डे पडले. विशेष करून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे चुकवून जावे लागत आहे. हे खड्डे बुजवावेत यासाठी आंदोलने झाली. मात्र, अद्याप जैसे थे परिस्थिती आहे. खराब कामे करणाऱ्यांवर कारवाई होणार का, असा सवाल भाविकांसह नागरिक विचारत आहेत.