माजी मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे हे अहमदनगरमधल्या भारजवाडी गावात एका कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यावेळी या दोघांनी जी भाषणं केली त्या भाषणांमध्ये जो उल्लेख केला आहे त्यामुळे या बहीण आणि भावांचं वैर मिटलं का? अशी चर्चा बीड जिल्ह्यात रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

धनंजय माझा मोठा भाऊ आहे याचा मला आनंद आहे. धनंजय माझ्यानंतर आज भाषण करणार आहे. कदाचित धनंजयनंतर चार वर्षांनी माझा जन्म होण्याचं काहीतरी कारण असेल. कुळाचा उद्धार वगैरे व्हायचा असेल. कुळाचा उद्धार करण्यासाठी एकाला दोन असले तर काय फरक पडतो? आम्ही कुठेही जाऊन पराक्रमी राहिली तरीही त्याचा पराक्रम वेगळा, माझा पराक्रम वेगळा, त्याचा पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा, त्याचा स्वभाव वेगळा माझा पक्ष वेगळा. त्याला फॉलो करणारे लोकं वेगळे माझे वेगळे. शक्ती ही सारखीच आहे.

लोकांसमोर आम्ही आमच्या अस्तित्वाची निर्मिती केली हे सत्य आहे. इथे कुणी दगड मारले धनंजयला हे चुकीचं झालं असेल तेव्हा पण याच्या मागे कुणाचा हात आहे? नामदेवशास्त्री गडावर असताना कसं झालं? आम्ही दोघं एकमेकांच्या पाठीवर जन्माला आलो आमचं भविष्य काहीतरी असेलच की त्याची वाट बघा, घाई करू नका. असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे. आम्ही एकत्र येऊ नये म्हणून लोकं देव पाण्यात घेऊन बसले. आता आमच्यापैकी वरचढ कोण हे राजकारण करू लागले. राजकारण खरं काय आहे? शेवटी लोकांचं प्रेम महत्त्वाचं असतं असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

धनंजय मुंडे यांनी काय म्हटलं आहे?

पंकजाने सांगितलं की मी भगवान गडाची पायरी आहे. मी तर त्यापुढे जाऊन सांगतो मी त्या पायरीचा एक दगड आहे. मोठा भाऊ या नात्याने लहान बहिणीने सांगितलं की भगवानगडाचं सगळं तूच बघ. माझं नाव, माझं नातं, माझं घर याची ओळख वेगळी. मी भगवान गडाचा भक्त आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने बहीण आणि भावाचं अंतर काही गज तरी कमी झालं.

धनंजय मुंडे यांचं भाषण सुरू असताना एका व्यक्तीने तुम्ही दोघांनी एकत्र याव असं म्हटलं. त्यावर जे होतं ते बऱ्यासाठी होतं असं धनंजय मुंडे म्हणाले. पंकजाताई दोनवेळा आमदार झाल्या, त्या मंत्री झाल्या. मी आमदार झालो, विरोधी पक्षनेता झालो आणि मंत्रीही झालो. जर असं झालं नसतं तर दोघांपैकी कोणीतरी एकच मंत्री झाला असता असं तुम्ही समजून घ्या असंही धनंजय मुंडे म्हणाले. या दोन्ही नेत्यांच्या भाषणांमधल्या या वक्तव्यांमुळे दोघांमधला दुरावा संपला का? याची चर्चा सुरू झाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde vs dhananjay munde conflict over these statements in the speeches of both sparked discussions scj
First published on: 12-04-2023 at 18:18 IST