छत्रपती संभाजीनगर : परभणी येथे न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांची विशेष तपास पथकाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या पथकात सदस्य म्हणून पोलीस अधीक्षक अभिजीत धाराशिवकर, राज्य गुन्हे विभागाचे उपअधीक्षक अनिल गवाणकर यांची नियुक्त करण्यात आली आहे. या पथकात परभणी जिल्ह्यातील कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी भारत सरकारने पुढाकार घ्यावा म्हणून हिंदू सकल समाज मोर्चा तर्फे करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान दत्ता पवार नावाच्या एका वेडसर व्यक्तीने परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना केली. त्यास अटक झाली. या घटनेचे पडसाद परभणीत दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ डिसेंबर २०२४ रोजी उमटले. जमाव हिंसक बनला. दगडफेक, जाळपोळ झाली. पोलिसांनी मग ५० जणांची धरपकड केली. यामध्ये एम.ए. आणि बीएड. शिक्षण घेतल्यानंतर विधि महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या ३५ वर्षाच्या तरुणाचा समावेश होता. त्याला अटक करण्यात आल्यानंतर १२ डिसेंबर २०२४ रोजी दोन दिवसाची पोलीस कोठडी आणि त्यानंतर दोन दिवसांनी न्यायालयीन कोठडीचे आदेश होते. या दरम्यान सोमनाथचा मृत्यू झाला. हा मृत्यू हृदय विकाराच्या धक्क्याने झाला असा पोलिसांचा दावा.
मात्र, सोमनाथ यांच्या मृत्यूनंतर सात जणांच्या डॉक्टरांनी केलेल्या उत्तरीय तपासणीमध्ये त्यांच्या अंगावर जवळपास २४ खुणा दिसत होत्या. अंतर्गत जखमा तर होत्याच. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस पोलीसच जबाबदार असल्याची तक्रार करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने केलेल्या अर्जानुसार गुन्हा दाखल करण्याचे निर्देश थेट सर्वोच्च न्यायालयाने दिले. या प्रकरणी विशेष तपास पथक दाखल करण्याच्या न्यायालयाच्या सूचनानंतर आता तीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकातील सदस्यांना सहकारी म्हणून अन्य काही जणांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या बाजूने ॲड्. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात बाजू मांडली होती.