परभणी : शेतकऱ्यांना सगळे फुकट पाहिजे असे म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाला मात्र हातपाय न हलवता बेकायदारीत्या कोट्यवधी रुपयांची जमीन फुकटात हवी, असे म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शनिवारी जोरदार टीका केली.

देवेंद्र फडणवीस हे भ्रष्टाचाराला ‘क्लीन चीट’देणारे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे याही प्रकरणात काहीच होणार नाही. अशी प्रकरणे जिरवण्यासाठीच सत्तेत येण्याकरिता या सरकारला मतचोरीशिवाय पर्याय नाही, असेही ते म्हणाले.

ठाकरे यांनी आज (शनिवारी) परभणी जिल्ह्यातील ताडबोरगाव येथे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. या प्रसंगी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, रवींद्र धर्मे, महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

पुण्यात अजित पवार यांच्या मुलाचा जमीन घोटाळा उघड झाला. त्याआधी मुरलीधर मोहोळ यांचे प्रकरण उजेडात आले. महिला डॉक्टरची हत्या की आत्महत्या, असाही प्रश्न उपस्थित झाला; पण कितीही आवाज उठवला तरी कोणत्याच प्रकरणात काहीच गांभीर्याने घ्यायचे नाही, असे सरकारने ठरवले आहे.

पुण्याच्या जमीन प्रकरणातही काही निष्पन्न होणार नाही. कोणाचीही गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणणार आणि सर्वांना क्लीन चीट देणार. या विषयावर पडदा पडणार. याच पद्धतीने कामे करायची असतील तर सत्ता हवी आणि सत्ता हवी असेल, तर यांना मतचोरीशिवाय पर्याय नाही, असे ठाकरे या वेळी म्हणाले.

विरोधकांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. जागरूक नागरिकांवर अर्बन नक्षलवादी म्हणून शिक्का मारला जात आहे. एकीकडे बोगस मतदान आणि दुसरीकडे ईव्हीएममधील हेराफेरी या पद्धतीने हे लोक सत्तेत आहेत. यांनी पक्ष चोरला, मत चोरली आणि आता जमीन चोरायला लागले आहेत. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची हीच वेळ आहे. राज्याचे कृषिमंत्री कर्जमाफी संदर्भातील समितीचा अहवाल एप्रिलपर्यंत येणे अपेक्षित आहे असे म्हणतात. मग कर्जमुक्ती करणार कधी, असा प्रश्न या वेळी ठाकरे यांनी उपस्थित केला.

या प्रसंगी खासदार संजय जाधव यांनीही हे सरकार खोकेवाल्यांचे सरकार आहे. जनता या सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही अशी टीका केली. आपल्यालाही सत्ताधाऱ्यांकडून खूप आमिषे आली; पण आपण कदापिही ठाकरे कुटुंबाला सोडणार नाही. एका अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्याच्या मुलाला खासदार होण्याची संधी ज्या पक्षाने दिली, त्या पक्षाशी कधीही द्रोह करणार नाही, असे जाधव यांनी स्पष्ट केले. या वेळी शेतकऱ्यांनी प्रतिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.