सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडल्यास कोकणातील प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होऊ शकते, अशी मागणी प्रवासी करत आहेत. विशेषतः जनशताब्दी, तुतारी, आणि सावंतवाडी-दिवा पॅसेंजर यांसारख्या कायम गर्दीने भरलेल्या गाड्यांमध्ये जादा डबे वाढवल्यास शेकडो प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकेल, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
सध्या अनेक गाड्यांमध्ये आसनक्षमता कमी असल्याने प्रवाशांना आरक्षण मिळत नाही, ज्यामुळे त्यांना प्रवास करणे शक्य होत नाही. जुन्या रचनेच्या गाड्यांमध्ये २४ डबे बसवता येत होते, तर नव्या गाड्यांमध्ये २२ डबे आहेत. यामुळे काही गाड्यांमध्ये पूर्वीपेक्षा कमी डबे असल्याने गर्दीची समस्या वाढली आहे.
कोणत्या गाड्यांमध्ये डबे वाढवण्याची गरज? सावंतवाडी-दिवा पॅसेंजर: ही गाडी सध्या १७ डब्यांची धावते आणि कायम हाऊसफुल्ल असते. यात आणखी ५ डबे वाढवल्यास ती २२ डब्यांची होईल, ज्यामुळे जवळपास ५०० हून अधिक प्रवाशांना सोयीस्कर प्रवास करता येईल. जनशताब्दी एक्सप्रेस: दिवसा धावणारी ही गाडी प्रवाशांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि ती नेहमीच पूर्ण भरलेली असते. सध्या १६ डब्यांची असलेल्या या गाडीत ५ ते ६ डबे वाढवल्यास जवळपास ३०० ते ४०० प्रवाशांची गैरसोय दूर होऊ शकते. वाढीव डब्यांसह १९ किंवा २० डब्यांची जनशताब्दी तिच्या वेगात कोणताही बदल न होता धावू शकेल,असा विश्वास प्रवाशांना वाटतो.
तुतारी एक्सप्रेस: सावंतवाडी ते दादर धावणारी ही गाडी कोकणवासीयांसाठी महत्त्वाची आहे आणि तिला नेहमीच प्रचंड गर्दी असते. सध्या १९ डब्यांची असलेली ही जुन्या डब्यांची गाडी आहे. यात अतिरिक्त ५ डबे वाढवून ती २४ डब्यांची केल्यास ५०० पेक्षा जास्त प्रवाशांची सोय होऊ शकेल.
हंगामी गाड्यांमुळे विलंब:
सणासुदीच्या काळात आणि सुट्ट्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त गाड्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होतात. यामुळे नियमित वेळेवर धावणाऱ्या गाड्यांना एक ते दोन तास उशीर होतो आणि प्रवाशांना ताटकळत राहावे लागते. या समस्येवरही तोडगा काढण्याची गरज आहे.
प्रवासी संघटनेची महत्त्वाची मागणी:
कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील सर्व गाड्या नेहमीच तुडुंब भरलेल्या असतात आणि अचानक प्रवास करण्याची वेळ आल्यास आरक्षण मिळणे खूप कठीण होते.
मिहीर मठकर यांनी सांगितले की, “आरक्षण नसल्यास प्रवाशांना आता प्रवास करता येणार नाही. त्यामुळे जादा डब्यांची नितांत गरज आहे.” त्यांनी सावंतवाडी रेल्वे स्थानकावर काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, नियोजित टर्मिनस यासाठी आंदोलन सुरू असल्याची माहिती दिली. तसेच, सावंतवाडी रेल्वे स्थानकावर तुतारी एक्सप्रेस थांबते, त्या प्लॅटफॉर्मवर तिकिट आरक्षणाची खिडकी उघडण्याची मागणीही त्यांनी केली. यामुळे प्रवाशांना ये-जा करताना तिकिट आरक्षणासाठी सोयीचे होईल, असेही ते म्हणाले.