नांदेड: जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपासून जोरदार पावसाला पुन्हा सुरुवात झाली.बहुतांश वीज यंत्रणा पाण्यात असल्याने अनेक प्रयत्न करुनही वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. बहुतांश ठिकाणचा वीज पुरवठा सुरक्षेच्या कारणास्तवही बंद ठेवण्यात आलेला आहे. पाण्याचा निचरा होऊन परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करणे सोयीचे होईल, असे सांगण्यात आले.

महावितरणच्या नांदेड परिमंडलातील नांदेड,परभणी आणि हिंगोलीतील वीज यंञणा अतिवृष्टीने प्रभावित झालेली आहे. याचा फटका गावठाणसह कृषी वाहिन्यांनाही बसलेला आहे. नांदेड जिल्ह्य़ात १९ गावे प्रभावित आहेत. त्यामुळे सुमारे १२ ते १३ हजार ग्राहकांचा काही तासापासून वीज पुरवठा बंद आहे.

गाणार, दगडगांव, वैजापूर, गोळेगाव , बेरळीसह देगलूर विभागातील वाजीरगाव , कोहळा, गडगा व नायगाव उपकेंद्रातील गावांना रोहीत्र, उपकेंद्र पाण्यात गेल्याने आणि काही ठिकाणचे वीजखांब कोसळून वीज वाहिन्या तुटल्याने मोठा फटका बसला आहे.

कंधारहून कुरुळ्याला जाणार्‍या ३३ केव्ही लाईन्स पुराच्या पाण्यात आहेत.शिवाय एक डीपी सांगाडा मोडून पडल्याने पेठवडज उपकेंद्र बंद ठेवण्यात आलेले आहे. हिंगोली जिल्ह्य़ातील कुरुंदकर, अंबादास, सोनथाना व डोनवाडा भागातील गावठाण विस्तार कृषी वाहिन्याही अतिवृष्टीत प्रभावित झाल्याने त्या परिसरातील वीज पुरवठा बंद आहे. महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.