सांगली : शेतकरी कर्जमुक्तीसह अन्य मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने शुक्रवारी सांगलीत अर्धनग्न होऊन गाजरवाटप आंदोलन करण्यात आले. संत तुकडोजी महाराजांच्या मोझरी या भूमीत श्री. कडू यांनी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला आज पाच दिवस झाले, तरी शासनाने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज सांगलीतील स्टेशन चौकामध्ये आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी अर्धनग्न होऊन गाजरवाटप केले.

आंदोलनामध्ये राजू कदम, अक्षय शिंदे, ओम भोसले, प्रल्हाद माने, श्रीकांत पवार, शिवराज पाटील आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी कार्यकर्त्यांनी राज्य शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजीही केली. बच्चू कडू यांच्या आंदोलनाची राज्य शासनाने त्वरित दखल घेऊन मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. दरम्यान, कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या, शनिवारी जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी आज दिला.