Prem Birhade vs Modern College Pune over London Job : लंडमध्ये नोकरी लागलेल्या प्रेम बिऱ्हाडे या तरुणाने पुण्यातील महाविद्यालयावर जिथून त्याने शिक्षण घेतलं त्या मॉडर्न महाविद्यालयावर जातीयवादाचा गंभीर आरोप केला होता. त्याने दावा केला आहे की “मला लंडनमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली होती. मात्र, मी ज्या महाविद्यालयातून पदवी मिळवली आहे त्या महाविद्यालयाने मी तिथून शिक्षण घेतलंय, पदवी प्राप्त केली आहे याबाबतचं पडताळणी प्रमाणपत्र माझ्या कंपनीला दिलं नाही. त्यामुळे माझी नोकरी गेली.”
“मी दलित असल्यामुळे महाविद्यालयाने मला प्रमाणपत्र दिलं नाही. कारण त्यांना एक दलित तरुण पुढे जातोय हे बघवलं नाही”, असा दावा प्रेम बिऱ्हाडे याने केला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक रील पोस्ट करून मॉडर्न महाविद्यालयावर आरोप केले आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रेमची बाजू घेत महाविद्यालयावर व व्यवस्थेवर संताप व्यक्त केला आहे.
महाविद्यालयाचं म्हणणं काय?
प्रकाश आंबेडकर यांनी देखील आरोप केला आहे की प्रेम बिऱ्हाडे हा दलित आहे म्हणूनच त्याचं प्रमाणपत्र दिलं नाही. दरम्यान, या सगळ्यावर आता महाविद्यालयाने आपली बाजू मांडली आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सचिव व मॉडर्न महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्यामकांत देशमुख म्हणाले, “प्रेम बिऱ्हाडे व प्रकाश आंबेडकर यांचे दावे तथ्यहीन आहेत. आम्ही सगळी प्रमाणपत्र व दस्तावेज संबंधित कंपनीला ई-मेल केले आहेत. परंतु, प्रेम आमच्याकडे तीन वर्षांसाठी होता (तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम) आणि कंपनीला पाच वर्षांचं स्क्रीनिंग अभिप्रेत आहे. त्यासाठी देखील आम्ही पोलीस प्रशासनाशी पत्रव्यवहार करून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत.” देशमुख टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
प्रेम बिऱ्हाडेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मॉडर्न कॉलेजच्या प्रशासनाच्या अन्यायकारक वर्तनाचा तीव्र निषेध करत वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी संघटनेने कॉलेजसमोर आंदोलन केले.
प्रकाश आंबेडकरांचा महाविद्यालयावर संताप
या घटनेबाबत प्रकाश आंबेडकरांनी एक पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अॅन्ड कॉमर्सच्या प्राचार्य डॉ. निवेदिता गजानन एकबोटे यांनी समाजमाध्यमांवर एक पत्र पोस्ट केली आहे ज्यामध्ये म्हटलं आहे की प्रेम बिऱ्हाडेला “विद्यार्थी असतानाच्या असमाधानकारक वर्तनामुळे पत्र जारी करण्यात आलं नाही. परंतु, पत्रात असंही म्हटलं आहे की प्रेम बिऱ्हाडेला यापूर्वी ३ शिफारस पत्रे आणि बोनाफाईड प्रमाणपत्र जारी करण्यात आलं आहे, जे त्याने यूकेमध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी वापरलं होतं. त्याचं वर्तन खरंच असमाधानकारक होतं तर मग बोनाफाइड प्रमाणपत्र व शिफारसपत्र का दिली होती.”