केंद्राच्या लसवाटप धोरणावर प्रश्नचिन्ह

रुग्णसंख्या अधिक असलेल्या महाराष्ट्राच्या तुलनेत उत्तर प्रदेशला ५६ लाख अधिक मात्रा

रुग्णसंख्या अधिक असलेल्या महाराष्ट्राच्या तुलनेत उत्तर प्रदेशला ५६ लाख अधिक मात्रा

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : उत्तर प्रदेशला जुलै महिन्यात केंद्राने १ कोटी ३० लाख मात्रा दिल्या असून पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात एखाद्या राज्याला लसमात्रा देण्यात आल्या आहेत. देशभरात उत्तर प्रदेशाला सर्वाधिक ३ कोटी ८४ लाख मात्रा देण्यात आल्या असून सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्राला ३ कोटी २८ लाख मात्रा पुरविण्यात आल्या आहेत. हे लसवाटप धोरण निकषांनुसार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

केंद्राने राज्यांना जानेवारीपासून लशींचे वाटप सुरू केले. त्या महिन्यात सर्वाधिक २१ लाख ३२ हजार लशी उत्तर प्रदेशला त्याखालोखाल महाराष्ट्राला १९ लाख ७२ हजार आणि कर्नाटकला १७ लाख १८ हजार, पश्चिम बंगालला १५ लाख मात्रा दिल्या गेल्या. फेब्रुवारीमध्येही सर्वाधिक ३० लाख १२ हजार मात्रा उत्तर प्रदेशला, महाराष्ट्राला २६ लाख ५१ हजार, पश्चिम बंगालला १६ लाख ४० हजार आणि गुजरातला १६ लाख १९ हजार मात्रा पुरविण्यात आल्या. मार्चमध्ये मात्र सर्वाधिक ५९ लाख ४३ हजार मात्रा राजस्थानला तर महाराष्ट्राला ५६ लाख ६३ हजार व गुजरातला ५४ लाख १५ हजार मात्रा दिल्या गेल्या.

एप्रिलमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक ६८ लाख ९३ हजार मात्रा मिळाल्या. तर उत्तर प्रदेशला ६३ लाख ६३ हजार, राजस्थानला ५२ लाख ७१ हजार व गुजरातला ५१ लाख मात्रा मिळाल्या.

मेमध्ये केंद्राने लस खरेदी खासगी आरोग्य कंपन्यांसाठी खुली केल्यामुळे एकूणच लसपुरवठा कमी झाला. त्यामुळे राज्याच्या वाटय़ाला येणाऱ्या लशींमध्ये कपात झाली. या महिन्यातही महाराष्ट्राला सर्वाधिक ४० लाख आणि उत्तर प्रदेशला ३३ लाख मात्रा पुरविल्या गेल्या. त्या खालोखाल गुजरातला ३० लाख ८० हजार मात्रा मिळाल्या.

जूनमध्ये पुन्हा केंद्राने लस धोरण बदलल्यामुळे लशींचा पुरवठा काही प्रमाणात वाढला. यावेळी पुन्हा उत्तर प्रदेशला सर्वाधिक ७७ लाख ८३ हजार आणि मध्य प्रदेशाला ६९ लाख ३५ हजार मात्रा मिळाल्या. तर महाराष्ट्राला ५९ लाख ८ हजार मात्रा दिल्या गेल्या.

धोरण पारदर्शी असल्याचा दावा

रुग्णसंख्या, लोकसंख्या, लशींचा योग्य वापर आणि वाया जाण्याचे प्रमाण या चार निकषांवर लशीचे वाटप केले जात असून लसवाटप धोरण पारदर्शी असल्याचे केंद्राच्या आरोग्य विभागाने जूनमध्ये जाहीर केले होते. देशभरात आठ राज्यांनी २ लाख ४९ मात्रा वाया घालविल्या असून यात उत्तर प्रदेशचा समावेश आहे. जुलैच्या आकडेवारीनुसार, देशात सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात ६० लाख ७५ हजार आहे. त्या खालोखाल केरळमध्ये ३२ लाख ४२ हजार, कर्नाटकमध्ये २८ लाख ४७ हजार, तमिळनाडूत २५ लाख ९ हजार, आंध्र प्रदेश १९ लाख ३६ हजारांवर रुग्णसंख्या गेली आहे. त्याच वेळी उत्तर प्रदेशमध्ये बाधितांची संख्या १६ लाख ८४ हजार, गुजरातमध्ये ८ लाख १४ हजार आणि मध्य प्रदेशमध्ये ७ लाख ८१ हजार आहे.

एकाच महिन्यात १ कोटी ३० लाख मात्रा

२४ जुलैपर्यंत उत्तर प्रदेशाला केंद्राकडून एकदम १ कोटी ३० लाख ७१ हजार २१० मात्रा मिळाल्या. देशभरात प्रथमच इतक्या मोठय़ा प्रमाणात एखाद्या राज्याला लशीचे वाटप केले गेले आहे. त्या खालोखाल मध्य प्रदेशला ७१ लाख ५४ हजार आणि महाराष्ट्राला ६६ लाख १५ हजार मात्रा देण्यात आल्या.

अतिरिक्त मात्रांचा वापर

तमिळनाडू (५, ८८,२४३), पश्चिम बंगाल (४,८७,१४७), गुजरात (४,६२,८१९), केरळ (३,९२,४०९), महाराष्ट्र (३,५९,४९३) आणि मध्य प्रदेश (३,५५,२५९) या राज्यांनी अतिरिक्त मात्रांचा वापर केला आहे.

लोकसंख्येनुसार क्रमवारी (लोकसंख्या कोटीमध्ये)

उत्तर प्रदेश (२२), महाराष्ट्र (१२.४७), बिहार (१२.१७), पश्चिम बंगाल (९.८७), आंध्र प्रदेश (८.७६), मध्य प्रदेश (७.२९), तमिळनाडू (८), राजस्थान (७.७१), कर्नाटक (६.८१) आणि गुजरात (६.८९)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Question marks over centre s vaccination policy zws

ताज्या बातम्या