कराड : पाटण तालुक्यात पावसाळा हंगामापूर्वी एक महिन्यापासून झालेल्या अतिवृष्टीनंतर पुढील चार महिने पावसाने पाटण तालुक्यातील शेतीचे अतोनात नुकसान केले. अतिपावसाने अंतिम टप्प्यातील उन्हाळी पिकांची नासाडी झाली, अशा ओल्या दुष्काळीस्थितीत केवळ तेराशेच पंचनामे करून प्रशासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप सातारा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व भाजपचे पाटण विधानसभा मतदारसंघ प्रचारप्रमुख विक्रमबाबा पाटणकर यांनी केला. पाटणकर यांनी याबाबत प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, तालुका कृषी अधिकारी बांबले यांच्याशी चर्चा केली.
यंदा काही ठिकाणी पेरणी झाल्या, तर काही ठिकाणी त्या झाल्याच नाहीत. अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली. जून, जुलै, ऑगस्टमध्ये सततच्या पावसाने पेरणी पिकांचे नुकसान झाले. मात्र, ओला दुष्काळ स्थितीत पाटण तालुक्यात सरासरी दोन लाखांपैकी फक्त तेराशेच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले, हे दुर्दैव आहे. इतर शेतकऱ्यांनी करायचे काय, असा प्रश्न करून तालुका प्रशासनाने नुकसान झालेल्या सरसकट शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी विक्रमबाबा पाटणकर यांनी केली.
विक्रमबाबा पाटणकर प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती करताना म्हणाले, की तालुक्यात केवळ तेराशेच शेतकरी आहेत का, यंदा तालुक्यातील पावसाचे प्रमाण पाहिल्यास ते सरासरी चार ते सहा हजार मिलिमीटरपर्यंत झाले. अनेकदा २४ तासांत चारशे ते पाचशे मिलिमीटर पावसाची नोंद आहे. त्यात पूरस्थितीही उद्भवली. त्यात तालुक्यातील ८० ते ८५ टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अशा वेळी सरासरी दोन लाख शेतकऱ्यांपैकी केवळ तेराशेच शेतकऱ्यांचे पंचनामे होतात का, मे महिन्यातील तेराशे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामेच प्रशासन अजूनही दाखवते.
जून, जुलै, ऑगस्टमधील नुकसानीचे काय, ओला दुष्काळस्थिती असताना, प्रशासनाकडून शेतकऱ्यांची ही फसवणूक असल्याचा आरोप पाटणकरांनी केला. अतिवृष्टीत काही ठिकाणी पेरण्या झाल्या तर काही ठिकाणी त्या झाल्या नाहीत, दुबार पेरण्याही ओढवल्या, अनेकांचे पेरलेले बियाणे उगवलेच नाही, या बाबी पंचनाम्यात घेतल्याच नाहीत. त्यांच्या नजरेत उगवून आलेल्या पिकाचे नुकसान एवढेच आहे. तरी प्रशासनाने अतिपावसातील नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला पाठवला पाहिजे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि तसे न झाल्यास आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे विक्रमबाबा पाटणकरांनी प्रशासनास ठणकावले.