अभिनेते प्रशांत दामले यांनी आज त्यांच्या कारकीर्दीमधला १२ हजार ५०० वा नाट्यप्रयोग ष्णमुखानंद सभागृहात सादर केला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती होती. दरम्यान, यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी प्रशांत दामले यांचे कौतुक केले.
“या कार्यक्रमाला येण्यापूर्वी येऊ की नको, अशी धाकधूक मनात होती. कारण थोड्या वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री येऊन गेले. यापूर्वीही आमचे दोनचार कार्यक्रम आमचे एकत्र झालेत. त्यामुळे उगाच लोकांना वाटेल की, एकावर एक फ्री आहेत, म्हणून हे येतात”, अशी टोलेबाजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
दरम्यान, यावेळी त्यांनी प्रशांत दामले यांचे कौतुकही केले. “आज प्रशांत दामले यांच्या १२ हजार ५०० व्या नाटकाचा प्रयोग झाला. इतके प्रयोग करणे करणे ही सोप्पी गोष्ट नाही. आज नाटक संपल्यावरही सर्व उपस्थित आहेत. त्यामुळे आमचीही नाटकं तुम्हाला चांगली वाटतात, हे या उपस्थितीतून कळते”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली.
हेही वाचा – “सहानुभूतीच्या नावावर मते मागितली, नंतर फटाके फोडले” मुरजी पटेलांची ऋतुजा लटकेंवर टीका
“काही दिवसांपूर्वीच मी अशोक सराफ यांचे ‘व्हॅक्यूम क्लिनर’ हे नाटक बघितले. जेव्हा त्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला, तेव्हा टाळ्यांचा कडकडाटात झाला. इतकी वर्षं रंगभूमीवर असताना स्वत:बद्दलचं कुतुहल जागृत ठेवणं ही साधी गोष्ट नाही. आज प्रशांत दामले १२ हजार ५०० वा प्रयोग करतात, तेही षण्मुखानंद सभागृहात. याची क्षमता दोन हजार ७०० एवढी आहे. इतकी वर्ष असं स्वत बद्दलचं कुहतूल सांभाळून ठेवणं सोप्पी साधी गोष्ट नाही”, असेही ते म्हणाले.