संगमनेर : संगमनेरच्या जनतेला परिवर्तन हवे होते. मतांच्या माध्यामतून या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने खऱ्या अर्थाने परिवर्तन करून दाखविले आहे. त्यामुळे कोणाच्या तरी सांगण्यावरुन पराभवाचे विश्लेषण करण्यापेक्षा बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाची खरी कारणे समजून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब तुम्ही कधीतरी मुंबईच्या बाहेर यावे. मी तुम्हाला संगमनेरला आमंत्रित करतोय, असा खोचक टोला महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

राज ठाकरे यांनी मुंबईत कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना थोरात यांच्या पराभवाविषयी शंका उपस्थित केल्या होत्या. त्याची राज्यभर चर्चा झाली. संगमनेरमध्येही गेले दोन दिवस हा विषय चर्चिला जात असून निकालामध्ये काहीतरी गौडबंगाल असल्याची शक्यता काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. राज ठाकरेंच्या वक्तव्याची दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी एक्स या समाज माध्यमावर आपली रोखठोक प्रतिक्रिया नोंदवली आहे.

या प्रतिक्रियेत आमदार खताळ यांनी म्हटले आहे की, “संगमनेरच्या जनतेने पाणीटंचाई, बेरोजगारी, अपूर्ण विकास व जनतेकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ४० वर्षांपासून निवडून दिलेल्या बाळासाहेब थोरात यांना नाकारलं आहे. ४० वर्षे आमदार, १७वर्षे मंत्री असून देखील तालुक्यात साधी एमआयडीसी सुद्धा होऊ शकली नाही . शेतीला पाणी नाही. मग जनतेने मत का द्यावी?” असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी संगमनेरची खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी संगमनेर भेटीला येण्याचे निमंत्रण आमदार अमोल खताळ यांनी दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले होते राज ठाकरे ?

नुकताच मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता मिळावा झाला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी अनेक गंभीर शंका उपस्थित केल्या होत्या. याच मेळाव्यात बोलताना ते म्हणाले होते की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे नेहमीच मोठ्या मताधिक्याने विजयी होत आले आहेत. सत्तर ते ऐंशी हजार मताधिक्याने जिंकणारे थोरात यंदा अवघ्या दहा हजार मतांनी पराभूत झाले, हे शक्य आहे का? पुढे त्यांनी ही निवडणूक लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे प्रखर नोंदवले होते. लोकांनी दिलेली मते कुठेतरी गायब झाल्याचा संशय व्यक्त करून या निवडणूक निकालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.