सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी आमदार राजन तेली यांनी गुरुवारी दसरा मेळाव्याचा मुहूर्त साधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवणारे तेली आठ महिने सक्रिय राजकारणापासून काहीसे अलिप्त होते. आता तेली यांच्या पक्ष प्रवेशाला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील कथित अनियमितता आणि चौकशीची शक्यता कारणीभूत ठरल्याची जोरदार चर्चा आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या २०२१-२०२२ मधील कर्ज प्रकरणांमध्ये अनियमितता आढळून आल्याने बँकेने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील बँक सुरक्षा व फसवणूक विभागाकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. राजन तेली आणि त्यांच्या आठ सहकाऱ्यांविरुद्ध बँकेतून कर्ज घेतल्याप्रकरणी ही चौकशी सुरू होणार असल्याची चर्चा आहे आणि तसे पत्रही प्राप्त झाले होते. दरम्यान, बँकेतील अनियमिततेची चौकशी राजकीय द्वेषातून प्रेरित असल्याचा आरोप तेली यांनी पालकमंत्री यांच्यावर केला होता. यानंतर लगेचच त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

आपणास कोणतीही नोटीस प्राप्त झाली नसल्याचेही राजन तेली यांनी म्हटले आहे. पक्ष बदलाचे कारण स्पष्ट करताना तेली यांनी ठाकरे गटात योग्य न्याय मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली. परंतु बँक प्रकरणाच्या चौकशीतून सुरक्षितता मिळवण्यासाठीच त्यांनी सत्ताधारी पक्षाचा आसरा घेतला असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पक्ष बदलाचा षट्कार

माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचे एकेकाळचे खंदे समर्थक राजन तेली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत सक्रिय होते. त्यानंतर राणे यांच्याबरोबर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटातून विधानसभेची उमेदवारी आणि आता आठ महिन्यांनी ते शिंदे गटात दाखल झाले. राणे यांच्या आधीच राजन तेली भाजपमध्ये दाखल झाले होते. परंतु भाजपमध्ये घुसमट वाढल्याने ते ठाकरे गटात गेले होते.