परभणी : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी जाहीर केलेले ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज ही शुद्ध फसवणूक असून, शेतकऱ्यांच्या हाती अतिशय तुटपुंजी रक्कम पडणार आहे. अशा तकलादू उपाययोजना करण्याऐवजी आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे केली.

शेट्टी हे शनिवारी (दि. २५) जिल्हा दौऱ्यावर आले असता येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार बैठकीत त्यांनी संवाद साधला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे व पदाधिकारी उपस्थित होते. यंदा राज्यात सर्वदूर अतिवृष्टी होऊन पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, असे ते म्हणाले.

महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. दिलेले आश्वासन पाळून सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या प्रमुख मागणीसाठी येत्या हिवाळी अधिवेशनावर राज्यातील सर्व शेतकरी संघटना मिळून आंदोलन काढणार असल्याचेही यावेळी शेट्टी यांनी जाहीर केले. हमीभावापेक्षा कमी दरात शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे लागत आहे.

अजून शासनाची खरेदी केंद्रे सुरू झाली नाहीत. व्यापारीच सोयाबीनची खरेदी करून साठेबाजी करतील. खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांचेच सोयाबीन घातले जाईल, असे ते म्हणाले. तसेच मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना किमान ३ हजार ३०० रुपये प्रति टन दर देण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

यावेळी शेट्टी यांनी सरकारच्या दुष्काळ पॅकेजवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले सरकारने जाहीर केलेले ३१ हजार कोटींचे पॅकेज फसवे आणि आकड्यांचा खेळ आहे. त्यातील निधीचा मोठा भाग रोजगार हमी योजनेत गेला आहे. दोन वर्षांपासून शेतकऱ्यांनी विहिरी काढल्या, पाणंद रस्ते केले मात्र पैसे मिळाले नाहीत.

अशा स्थितीत रोजगार हमीच्याद्वारे होणाऱ्या कामांचे पैसे लवकर मिळतील, याची खात्री नाही. थेट शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी सरकार बाकीच्याच गोष्टी करू लागले आहे, असेही ते म्हणाले. यंदा राज्यात सर्वदूर अतिवृष्टी होऊन पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, असे ते म्हणाले.