डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे विधी महाविद्यालय तासगाव तालुक्यातील बलगवडे येथे प्रस्तावित आहे. या महाविद्यालयाच्या जागेची पाहणी पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज बलगवडे येथे केली. यावेळी आठवले यांच्या हस्ते गावातील ४ कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संजय काका पाटील होते.
यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, शिक्षणाशिवाय आपलं रक्षण होणार नाही, हे ओळखून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई येथे पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेत सध्या एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या शिक्षण संस्थेसाठी बलगवडे गावाने दहा एकर जागा दिली, त्याबद्दल मी समस्त गावकऱ्यांचे आभार मानतो.
आठवले पुढे म्हणाले की, या विधी महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी शिवाजी विद्यापीठाला पत्र दिलं आहे. मंजूरी मिळाली की महाविद्यालयाची सुसज्ज इमारत उभी करू. शेजारची आणखी २५ एकर जागा शिक्षण संस्थेस देण्याविषयी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलणार आहे. मोठी जागा मिळाली तर तिथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा विचार करु, असं आश्वासन रामदास आठवलेंनी दिलं.
हेही वाचा- “मशिदींवरील भोंगे काढण्यापेक्षा मंदिरांवर भोंगे लावा”, रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना सल्ला
बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना आठवले सांगितलं, “माझं बालपण याच भागात गेले आहे. माझे प्राथमिक शिक्षण या गावच्या शेजारी असलेल्या सावळज येथे झाले. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या या शैक्षणिक कॅम्पसमुळे या भागाचा विकास होणार आहे. आता या गावचा विकास करण्याची जबाबदारी आता केंद्र सरकार व राज्य सरकारवर आहे.”